बीड : बीड शहरातील एक मुलगा खेळताना वीजेच्या बोर्डला चिटकला. तर दुसरा मुलगा खेळताना विहिरीत पडला. सुदैवाने नातेवाईकांनी वेळीच पाहिल्याने हे दोन्ही बालके बचावली. सध्या या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. या घटना मंगळवारी उघडकीस आल्या.
बीड तालुक्यांतील गाडेवाडी येथील प्रकाश वावरे यांनी उन्हात घटकाभर विसावा घ्यावा म्हणून पडले. त्यांना कधी झोप लागली ते कळलेच नाही. त्यांच्या जवळ असलेला दोन वर्षाचा तेजस्वी वावरे हा दोन वर्षाचा मुलगा खेळत असताना मंदिराजवळच्या विहिरीत पडला. विहिरीत चारपाच फुट पाणी होते. इकडे मुल दिसत नाही म्हणून आईने आरडाओरड सुरु केली. एवढ्यात प्रकाश शेषराव वावरे यांनी शोधाशोध सुरू केली. बाजूलाच असलेल्या विहिरीत त्यांना तेजस्वी गटांगळ्या खाताना दिसला. त्यांनी तात्काळ विहिरीत उतरून त्याला बाहेर काढले. बेशुद्धावस्थेत त्याला बीड येथील खाजगी बालरुग्णालयात दाखल केले. आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. संजय जानवळे, डॉ. अनंत सांगळे यांनी सांगितले.
बीडमध्ये चुलतीची समयसुचकताबीड शहरातील खंडेश्वरी मंदिर परिसरात राहणारा आर्यन नितीन गालफाडे हा दहा वर्षाचा मुलगा घरामध्ये लाईटच्या बोर्डाला चिकटला. यावेळी बाजूलाच असलेल्या आर्यनची चुलती पुजा राहूल गालफाडे यांनी त्याला हातातल्या बेलण्याने बोर्डापासून दूर करत त्याचे प्राण वाचवले. त्यालाही गंभीर अवस्थेत बाल रूग्णालयात दाखल केले. त्याचीही प्रकृती आता स्थिर असल्याचे डॉ.जानवळे व डॉ.गौरी चरखा यांनी सांगितले.