परळी (जि. बीड) : शहरापासून आठ किलोमीटरवर असलेल्या बीड रोडवरील गजानन आॅईल मिलमध्ये रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास झालेल्या स्फोटात बॉयलर आॅपरेटर गोपाळ लक्ष्मण गंगणे (५०, रा. भगुरथ, ता. अकोला) यांचा मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले.
ही आॅईल मिल गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. मिल पुन्हा चालू करण्यासाठी दुरुस्ती, डागडुजीचे काम सुरू होते. नेहमीप्रमाणे अनेक कामगार सकाळी मिलमध्ये आले असतानाच सकाळी मिलच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये अचानक भीषण स्फोट झाला. यात बॉयलर आॅपरेटर गोपाळ गंगणे यांचा जागीच मृत्यू झाला, तर बॉयलर अटेंडन्ट ज्ञानोबा अमृतराव लुंगेकर (५२, रा. बोधेगाव, ता. परळी) आणि प्रोडक्शन सुपरवायझर गोपाळ वासुदेव घाटूळकर ( ३८, रा. पिंपळखुर्द, ता. पातूर, जि. अकोला) हे गंभीर भाजले. दोन्ही जखमींना अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असून, उपचार सुरू आहेत. स्फोट एवढा भीषण होता की, संपूर्ण पत्र्याचे शेड उद्ध्वस्त झाले. घटनास्थळी जुने कॅपॅसिटर होते. जवळच विद्युत व्यवस्थेचा बोर्ड होता. तसेच आॅईलचे बॅरलही होते. त्यामुळे स्फोट कशाचा झाला हे समजू शकले नाही.
एटीएस, बॉम्बशोध पथकाची पाहणीदहशतवादविरोधी तसेच बॉम्बशोध व नाशक पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. घातपाताचा संशय नसल्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांनी सांगितले.
पेटते पोते ऑईलच्या बॅरलवर पडलेकारखाना परिसरातील मोहोळ झाडण्यासाठी पोते पेटविले होते. यात जवळच बॅरलमध्ये असलेल्या ज्वलनशील पदार्थाने पेट घेतला आणि त्यामुळे स्फोट झाला. स्फोटानंतर बॅरलमधील आॅईल उडाले. यात तिघे भाजले. गोपाळ गणगे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. स्फोटाचे नेमके कारण तपासाअंती समजेल, असे एपीआय मारुती शेळके यांनी सांगितले.