लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास बीड - अहमदनगर महामार्गावर कासारीजवळ घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील जयवंत नगर येथील रहिवासी क्रांती इंद्रजित नागरगोजे हे दुचाकी क्रमांक (एमएच १२ टीएफ २६३)ने रांजणगाव येथून गावाकडे परतत होते. ५ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास बीड - अहमदनगर महामार्गावर आष्टी तालुक्यातील कासारी गावानजीक अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील क्रांती नागरगोजे यांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस नाईक ए. एम. सुंबरे व के. आर. शिरसाठ यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. आष्टी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक ए. एम. सुंबरे करत आहेत.