अंबाजोगाई : अंबाजोगाई ते पिंपळा धायगुडादरम्यान महामार्गाच्या रखडलेल्या कामाने रविवारी आणखी एक बळी घेतला. अंबाजोगाईतील काम आटोपून गावाकडे निघालेल्या प्रकाश तुकाराम जाधव (४९, रा. निरपणा, ता. अंबाजोगाई) नामक व्यक्तीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. एका बँकेत सुरक्षारक्षक असलेले प्रकाश जाधव हे रविवारी सायंकाळी दुचाकीवरून गावाकडे निघाले होते. वाटेत शेपवाडी गावाच्या कमानीजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात डोक्याला गंभीर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती आहे. माहिती मिळाल्यानंतर अंबाजोगाई शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.
संथ कामामुळे अपघाताची शृंखला सुरूच
दरम्यान, अंबाजोगाई ते पिंपळा धायगुडादरम्यानचे महामार्गाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. शहरालगतचा रस्ता असल्याने याठिकाणी प्रचंड वाहतूक असते. संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीने कसल्याही प्रकारचे वाहतुकीचे नियोजन न करता कामासाठी हा रस्ता खोदून ठेवल्याने वाहनधारकांना अक्षरशः जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. लहान-मोठे अपघात सातत्याने घडत असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मागील महिन्यात या ठिकाणी अज्ञात वाहनाने चिरडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारच्या अपघातात आणखी एक बळी गेला. या अपघातांसाठी कन्स्ट्रक्शन कंपनीला दोषी धरून गुन्हे दाखल करावेत, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.