- सोमनाथ खताळ
बीड : आंध्र प्रदेशातील एका बहीण-भावाला हॉस्टेलमध्ये ठेवते अशी बतावणी त्यांच्या आईला करत एका महिलेने त्या दोघांना लातूरला आणले व लाखात सौदा केला. ही बाब या मुलांना समजली. परत घरी सोडण्याची विनंती केल्यावर दोघांना मारहाण करून गरम चटके देण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या मुलांनी प्रसंगावधान राखत तेथून धूम ठोकली. सध्या या दोन्ही भावंडांवर येथील जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
गुड्डी आणि सुरज (नाव बदललेले) हे दोघे बहिण भाऊ. गुड्डी आठ वर्षांची तर सुरज दहा वर्षांचा. हे दोघेही मुळचे कडाप्पा (आंध्र प्रदेश) येथील रहिवासी. ते चौघे जण बहिण भाऊ असून त्यांना वडील नाहीत. पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्या आईच्या ओळखीच्याच एका महिलेने त्यांना हॉस्टेलमध्ये ठेवते, असे सांगत लातूर जिल्ह्यातील चाकूरला आणले. येथे दहा दिवस त्यांच्याकडून काम करून घेतले. या दोन्ही मुलांचा सौदा केला जाणार होता. ही माहिती या मुलांना समजली. त्यांनी आईकडे जाण्याचा हट्ट धरला. मात्र त्यांना स्पष्ट नकार देण्यात आला. सुरज हा मोठा असल्याने पळून जाण्याची तयारी करत होता. ही चुणचुण त्या महिलेला लागली. तिने या दोघांनाही बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर गरम वस्तूचे अंगावर चटके दिले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले.
आपली सुुटका होणार नाही, हे त्यांना समजले होते. त्याच रात्री या दोघांनी सर्व झोपेत असताना रेल्वे स्थानक गाठले. रेल्वेत बसून ते परळीला आले. येथे रेल्वे पोलिसांना ही माहिती समजली. पोलिसांनी बालहक्क कार्यकर्ता तत्वशील कांबळे यांना माहिती देत दोघांना बीडला आणले. सध्या त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती धोक्याबाहेर आहे. दोन्ही मुलांना जबर मारहाण झालेली आहे. हा प्रकार संशयास्पद असल्याने आम्ही गुन्हा दाखल करणार असल्याचे बालहक्क कार्यकर्ता तत्वशील कांबळे यांनी सांगितले.या दोन्ही मुलांना गेवराई तालुक्यातील सहारा अनाथालयात दाखल करण्यात आले. संतोष व प्रीती गर्जे यांनी त्यांचा दोन दिवस सांभाळ केला.
चाकूर पोलिसांना चुकीची माहितीज्या महिलेने या दोन मुलांना आणले होते, तिच्या पतीने चाकुर पोलीस ठाण्यात मुले हरवल्याची तक्रार दिली आहे. मात्र फिर्यादीत दाखल नावे आणि या मुलांचे आधार कार्डवरील नावे यात फरक आहे. त्यामुळे हा प्रकार खोटा असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. बीडच्या शासकीय रूग्णालयात याची नोंद झाली असून शनिवारी चाकूर पोलीस जबाब घेण्यासाठी येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुलांनीच वाचला पाढागुड्डी व सुरज यांना तेलगूशिवाय एकही भाषा येत नाही. त्यामुळे भाषा समजणारी व्यक्ती बोलवून त्यांची समस्या जाणून घेतली. यावेळी त्यांनी आपला एक लाख रूपयांत सौदा झाला होता, आणि आपल्याला विक्री केली जाणार होते, असे सांगितले. आम्हाला आमच्या आईकडे जायचे आहे, असे म्हणत त्यांनी एकच टाहो फोडला.