अंबाजोगाई : कडक लॉकडाऊन सुरू असतानाही किराणा दुकानातून चोरीछुपे गुटखा विक्री करणाऱ्या एका महाभागास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. यावेळी त्याच्याकडून गुटख्यास १ लाख ५५ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मंगळवारी अंबाजोगाई शहरातील रविवार पेठेत उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली.
जिल्ह्यात २५ मेपर्यंत कडक लॉकडाऊनचे आदेश जारी आहेत. या कालावधीत अगदी किराणा दुकाने, भाजीपाला विक्रीदेखील बंद ठेवण्यात आली आहे. असे असतानाही रविवार पेठेतील दमगनपुरा भागात जाकेर नासेर मणियार हा त्याच्या किराणा दुकानातून गुटख्याची चोरीछुपे विक्री करत असल्याची गुप्त माहिती सुनील जायभाये यांच्या पथकाला मिळाली होती. सदर माहितीची खातरजमा झाल्यानंतर मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास जायभाये यांच्या पथकाने जाकेरच्या दुकानावर छापा मारला. यावेळी पोलिसांनी दुकानातून राजनिवास, बाबाजी, विमल, एक्का, फेमस, गोल्ड या कंपन्यांचा एकूण १ लाख ५ हजार ४५० रुपयांच्या गुटख्यासह दुचाकी आणि मोबाइल असा दीड लाखाचा मुद्देमाल जप्त करून जाकेरला ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस अंमलदार सपकाळ यांच्या फिर्यादीवरून जाकेर नासेर मणियार याच्यावर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर. राजा, अपर अधीक्षक स्वाती भोर, डीवायएसपी जायभाये यांच्या मार्गदर्शनखाली पीएसआय गोपाल सूर्यवंशी, सहा. फौजदार बोडखे, पोलीस कर्मचारी सतीश कांगणे, नितीन आतकरे, सपकाळ यांनी केली.