बीड - जिल्ह्यातील परळी येथे सकल मराठा समाजाच्यावतीने ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल मराठा समाज बांधवांतर्फे ऋणनिर्देशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला हजर राहण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन केले. त्यावेळी, हातात तलवार घेऊन घोड्यावरुन फेरफटकाही पंकजा मुंडेंनी मारला.
मराठा आरक्षण मिळाल्याचा मला खूप आनंद आहे. विशेष म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालंय, हे मुंडेसाहेबांचा स्वप्न होतं. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळेल तरच ते टिकेल, असेही मुंडेसाहेबांनी म्हटल्याच पंकजा यांनी सांगितलं. मराठा आरक्षणावेळी आपण एक मराठा लाख मराठा ही घोषणा दिली. आता, एका मराठ्यानं एक लाख मतांचं नियोजन करायचंय, असेही पंकजा यांनी म्हटले.
खुदसे जितने की जीद है मुझे, मुझे खुदकोही हरना हैमै वीर नही हूँ दुनिया की, मेरे अंदर ही जमाना है
असे म्हणत माझी लढाई कुणाशाही नाही, माझ्या लढाईत सामान्य माणूस माझ्यासोबत आहे. आता तर पावण्या-रावळ्याचा विषय नाही भविष्यात. निवडणुकांवेळी माणसाच्या कर्तृत्वाला बघून मतदान करा. पाहुण्याला लग्नाला बोलवा, बारशाला बोलवा, साखरपुड्याला बोलवा, असे म्हणत लोकसभा निवडणुकांतवेळी झालेल्या जातीय समीकरणावरुनही पंकजा यांनी चिमटा काढला.
तुमच्या गळ्यात कोणाताही गमजा असो, भगवा असो निळा असो, पिवळा असो, लाल असो. पण आता आपल्याला एकच संधी आहे, तुमचं भलं करण्यासाठी, माझं नाही. मी नेहमीच चांगल्या हेतूने राजकारण करते म्हणूनच मी इथपर्यंत आले. ज्या दिवशी हेतू सफल होणार नाही, त्या दिवशी मी राजकारणात नसेल. माझा हेतू तुमच्या भविष्यासाठी नाही, तुमच्या चांगल्यासाठी नाही, तोपर्यंत माझ्या जीवनात कुठल्याही गोष्टीला स्थान नाही. आता, आपण इथून एक निश्चय करून जायचंय. एक मराठा लाख मराठा ही घोषणा आपण दिली. आता, एका मराठ्यानं लाख मतांचं नियोजन आपल्याला करायचंय, असे म्हणत पंकजा यांनी मराठा समाजातील कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी, सर्वसामान्य माणसांच्या भविष्यासाठी आपल्याला काम करायचंय असेही त्यांनी म्हटले.