बीड : एचआयव्हीसारख्या दुर्धर आजाराने जडलेल्या जोडप्याच्या बीडमध्ये रेशीमगाठी जुळल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील विवाह निबंधक कार्यालयात हा सोहळा थाटात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
पाली (ता.बीड) येथील इन्फंट इंडिया या संस्थेतील १९ वर्षीय मुलीचा औरंगाबाद येथील मुलासोबत विवाह जुळला होता. जन्मता:च एचआयव्हीची लागण झालेली मुलगी २००७ साली या संस्थेत दाखल झाली होती. तेव्हापासून तिचा सर्व सांभाळ, शिक्षण आणि इतर गरजा संस्थेने भागविल्या. नुकताच आयोजित केलेल्या वधु-वर परिचय मेळाव्यात तिची ओळख औरंगाबादच्या मुलासोबत झाली. यातुन त्यांनी विवाह करण्याचा निश्च केला. गुरूवारी विवाह निबंधक कार्यालयात सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा सोहळा थाटात पार पडला. इन्फंटचे संचालक संध्या व दत्ता बारगजे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वऱ्हाडी म्हणून उपस्थित रहात या नवदाम्पत्यास शुभाशिर्वाद दिले.
सामाजिक कार्यकर्त्यांकडून मदतनववधुला मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते अय्यद यांनी सोन्याचे डोरले घेतले. बीडचे गौतम खटोड व डॉ.अनिल बारकुल यांनी जेवणाची, मनोज अग्रवाल यांनी पाण्याची व्यवस्था केली होती. तसेच साडी व इतर कपडे जालना येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी दिले होते.