अंबाजोगाई: अंबाजोगाई-लातूर रोडवर बर्दापूर पाटी नजीक कार, पिकअप टेम्पो आणि दुचाकीचा भीषण तिहेरी अपघात झाल्याची घटना घडली आहे. या तिहेरी अपघातात दुचाकीस्वार शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी (दि.०९) रात्री ११.३० वाजता झाला. भुनम्मा सायन्ना शिरपे (वय ३९) असे अपघातात मृत झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. ते घाटनंदूर येथील शाळेत शिक्षक होते.
भुनम्मा शिरपे हे शनिवारी रात्री दुचाकी(एमएच ४४ एल ७१५२)वरुन लातूरहून अंबाजोगाईकडे येत होते. बर्दापूर पाटीच्या थोडेसे पुढे आले असता डिझायर कार (एमएच २० बीवाय ९७८७) आणि पोल्ट्रीच्या कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या भरधाव पिकअप टेम्पो सोबत त्यांच्या दुचाकीचा तिहेरी अपघात झाला. या अपघातात भुनम्मा शिरपे यांचा जागीच मृत्यू झाला तर रोहित कुचेकर (रा. परळी वेस, अंबाजोगाई) आणि डिझायरचा चालक अशोक कदम (वय ३०, रा. आपेगाव) हे दोघे गंभीर जखमी झाले.
यानंतर १०८ रुग्णवाहिकेचे डॉ. सचिन कस्तुरे आणि चालक पुरुषोत्तम ओव्हळ यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमींना स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघातानंतर काही काळ रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता मात्र, बर्दापूर पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत वाहतुक सुरळीत करून दिली. नवीन महामार्गामुळे वाहने वेगात आहेत. तसेच सिमेंट काँक्रीटच्या टणक रस्त्यामुळे डोके फुटून मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे वाहने सावकाश चालवावीत आणि दुचाकीस्वारांनी सतत हेल्मेट वापरावे असे आवाहन बर्दापुर पोलिसांनी केले आहे.
चौपदरी मार्गाची आवश्यकता
लातूरहून अंबाजोगाईकडे येणारा चौपदरी महामार्ग बर्दापुरपासून पुढे दुपदरी होतो. त्यामुळे बर्दापूर ते सायगाव दरम्यान अपघाती मृत्यूचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. हा मार्ग पुढे लोखंडी सावरगाव पर्यंत चौपदरी करावा अशी मागणी सातत्याने होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील अंबासाखर येथील कार्यक्रमात या मार्गाचे चौपदरीकरण करण्याचे जाहीर केले होते. मात्र कालौघात त्यांचे आश्वासन हवेत विरले. निदान आता तरी अपघाती मृत्यूंचे प्रमाण लक्षात घेता चौपदरीकरणाला त्वरित सुरुवात करावी अशी मागणी होत आहे.