बीड : शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत बीडच्या वनविभागाने रविवारी पालवण येथील डोंगरावर आयोजित महाश्रमदानात १२ सामाजिक संस्था व ३०० नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत वृक्ष लागवडीसाठी एक हजार खड्डे खोदले. या जागेवर १ जुलै रोजी वृक्षारोपण केले जाणार असल्याची माहिती विभागीय वनअधिकारी अमोल सातपुते यांना दिली.
वैश्विक उष्णतेमध्ये होणारी वाढ, हवामानातील बदल, वाढते प्रदूषण याबाबत गांभिर्याने घेत शासनाने या वर्षी विविध विभाग आणि जनतेच्या सहभागातून ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यावर्षी १३ कोटी वृक्षांची लागवडी केली जाणार आहे. या उपक्रमांतर्गत बीडच्या वनविभागाने आतापासूनच कंबर कसली असून, जिल्हाभर ३३ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत पालवण ते पिंपळवाडी येथील डोंगरावर ४० हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यामुळे रविवारी पालवण येथील डोंगरावर महाश्रमदान करण्यात आले. विभागीय वनअधिकारी अमोल सातपुते यांनी केलेल्या आवाहनानुसार सामाजिक संस्था, नागरिक, विद्यार्थ्यांनी महाश्रमदानात सहभाग नोंदवला.
यावेळी अमोल सातपुते म्हणाले की, गेल्या काही वर्षात वृक्षतोड मोठया प्रमाणात झाल्याने त्याचा विपरीत परिणाम जनसामान्यांवर, वातावरणावर झालेला दिसून येत आहे. वृक्ष आणि वन याचे महत्व संत तुकाराम महाराजांनी चारशे वषार्पूर्वी त्यांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या अभंगाच्या माध्यमातून सांगितले आहे. यासाठी शासनाने पुढाकार घेतला असुन प्रत्येकाने एक झाड लावून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली तर महाराष्ट्रात भेडसावू लागलेले संभाव्य धोके रोखण्यात मानवाला यश मिळेल आणि त्यातूनच चिरंतन शाश्वत विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकेल असे सांगितले.
यावेळी इंडियन मेडिकल असोशिएनचे डॉ. खरवडकर, डॉ. प्रदिप शेळके, डॉ. कट्टे, सामाजिक वनीकरणचे काजी, वनपरिक्षेत्र अधिकारी एल.बी.दिवाणे, पाटोदा वनपरिक्षेत्र अधिकारी सयमा पठाण, वनपाल अरविंद पायाळ, वनरक्षक एस. एस. वनवे, शिवाजी कांबळे, लांडगे, ए.पी.बहिरवाळ, रेणुका माऊली सेवाभावी संस्थेचे राजू वंजारे, अभिजीत वैद्य, शालिनी परदेशी, नीता कांबळे, विशाखा परदेशी, अश्विनी तिपाले, आरती पिल्ले, ललिता तांबारे, यश वंजारे, शिवराम घोडके, अनिल शेळके, शेख तय्यब, संतोश थोरात, शेख अमीर पाशा, दीपक तांगडे, बाजीराव ढाकणे, किरण डोळस, रेखा शितोडे, माया तिरमले, मातृभूमि प्रतिष्ठाणचे संजय तांदळे, महारूद्र मोराळे, हेल्पिंग हँड ग्रुपचे व्यंकटेश माने, जगजीवन घोडके, अॅड. डोईफोडे, प्रेरणा डोईफोडे आदींनी सहभाग घेतला होता.
१ जुलैला लावणार ४० हजार रोपे सकाळी ७ ते अकरा वाजेपर्यंत झालेल्या महाश्रमदानात वृक्ष लागवडीसाठी एक हजार खड्डे खोदले आहेत. या ठिकाणी वनविभागाच्या वतीने पूर्वी ३९ हजार खड्डे खोदण्यात आले आहे. त्यात आज एक हजार खड्डयांची भर पडली आहे. एकूण ४० हजार खड्ड्यांमध्ये १ जुलै रोजी रोपे लावण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.
पथनाट्यातून जनजागृतीया कार्यक्रमात प्लास्टिक बंदी व त्यावरील दंड, स्वच्छ भारत अभियान, झाडे लावा, शौचालयाचा वापराबाबत पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली. यामध्ये किशोर धुताडमल, रंगा अडागळे, संतोष पैठणे, राजु धुताडमल, नीलेश लोंढे, ओम धुताडमल यांनी गाण्यांतून जनजागृती केली.