बीड : गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे यात्रेदरम्यान एका कटलरी विक्रेत्याच्या मनोरुग्ण पत्नीचा विनयभंग केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने मच्छिंद्र नरहरी चिकणे (रा. गंगावाडी, ता. गेवरार्ई) यास दोषी ठरवून एक वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा सत्र न्या. क्र. २ ए. एस. गांधी यांनी सुनावली. दंडाची रक्कम प्रकरणातील पीडितेच्या उपचारासाठी देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.
६ वर्षांपूर्वी १९ मे रोजी तलवाडा येथे देवीची यात्रा सुरु होती. तेथे एका कटलरी विक्रेत्याने दुकान थाटले होते. त्याची पत्नी मनोरुग्ण असल्याने ती इतरत्र जाऊ नये म्हणून तिला तंबूमध्ये बांधून ठेवले होते. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास तंबूमध्ये घुसून विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित महिलेच्या पतीने तलवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन विनयभंग, तसेच बलात्काराचा प्रयत्न करणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल झाला होता. सहायक पोलीस निरीक्षक गीर यांनी तपास केला. या दरम्यान महिलेची वैद्यकीय तपासणी तसेच साक्षीदारांचे जवाब नोंदवून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
सदर प्रकरणात आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षाच्या वतीने ८ साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व इतर पुराव्यांचे अवलोकन करुन तसेच न्यायालयासमोर आलेल्या तोंडी व कागदोपत्री पुरावा आणि एका साक्षीदाराची साक्ष गृहित धरुन सत्र न्या. क्र. २ ए. एस. गांधी यांनी विनयभंग प्रकरणी आरोपीला वरील शिक्षा सुनावली.
या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. बी. एस. राख यांनी काम पाहिले. त्यांना जिल्हा सरकारी वकील अजय राख, सहायक सरकारी वकील अनिल तिडके, आर. बी. बिरंगळ, ए. पी. हसेगावकर, एस. व्ही. सुलाखे, आर. पी. उदार यांनी सहकार्य केले.