बीड : विनाक्रमांकाच्या टेम्पोतून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्यास अडवून चौकशी करणाऱ्या उपनिरीक्षकास मारहाण केल्याची घटना अडीच वर्षांपूर्वी शिरुर कासार येथे घडली होती. याप्रकरणी टेम्पोचालकास जिल्हा व सत्र न्यायालयाने एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
शिरुर ठाण्याचे उपनिरीक्षक मनोज बरुरे हे २८ मे २०१९ रोजी शिरुर येथील न्यायालयासमोर वाहनांची तपासणी करत होते. यावेळी त्यांना विनाक्रमांकाच्या टेम्पोतून वाळू वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी हात दाखवून इशारा करत टेम्पो थांबविला व विचारपूस सुरू केली. मात्र, यावेळी टेम्पाेचालक देविदास गहिनीनाथ जायभाये (३१,रा. पिंपळनेर, ता.शिरुर) याने बरुरे यांना अरेरावी केली.
टेम्पोतील कत्ती घेऊन तो त्यांच्या अंगावर धावून गेला. त्यानंतर धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला म्हणून शिरुर ठाण्यात गुन्हा नोंद झाला. हे प्रकरण सुनावणीसाठी जिल्हा व सत्र न्यायालयात आले. न्या. एच. एस. महाजन यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकार पक्षाकडून अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील शाम भा. देशपांडे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून सहायक उपनिरीक्षक सी. एस. इंगळे, रमेश उबाळे, पो. ना. सी. एस. नागरगोजे यांनी त्यांना सहकार्य केले.
चार साक्षीदार तपासलेसरकार पक्षातर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीपुरावे व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्या. एच. एस. महाजन यांनी देविदास जायभाये यास दोषी ठरवले. कलम ३५३ भादंविप्रमाणे त्यास एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा तसेच एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद अशी शिक्षा सुनावली.