बीड : शहरातील खासबाग येथील आडत बाजारात रोज दहा ते पंधरा टन आवक होत होती. ती आता १५ ते २० टन होत आहे. मात्र होलसेल बाजारात भाजीपाला स्वस्त तर शहरातील विविध भागात आणि कॉलन्यांमध्ये विकल्या जाणाऱ्या भाज्यांचे दर दुप्पट, तिप्पट तर कुठे वाजवी असल्याचे पहायला मिळाले. सध्या भाज्यांची आवक जास्त व ग्राहकी कमी असल्याने भाव पडले आहेत. यातच कोरोनानंतरच्या परिस्थितीमुळे वीटभट्टी, बांधकामावरील मजूर, फेरीवाले, भंगार खरेदी करणारे भाजीपाला विक्री व्यवसायाकडे वळले आहेत. किरायाचा हातगाडा घेऊन किंवा एकाच ठिकाणी बसून ते भाजी विक्री करतात. वाहतूक खर्च, दिवसभर करावी लागणारी पायपीट यामुळे या विक्रेत्यांकडील भाजीपाला तुलनेने काहीसा महाग वाटतो. परंतु घरपोच ताजा भाजीपाला मिळत असल्याने मंडईपासून दूर अंतरावर राहणाऱ्यांची सोय झाली आहे.
१) हा बघा दरांमधील फरक (प्रतिकिलो दर )
भाजीपाला आडतबाजार घराजवळ
कांदे १२ २०
बटाटे १३ ३०
टोमॅटो १२ २०
शिमला मिरची १० ४०
शेवगा ४० ८०
दोडका २५ ४०
भेंडी २० ४०
फ्लॉवर २० ४०
वांगी २५ ६०
मेथी जुडी ०५ ०७
२) पेठेत शेवगा ८० तर उत्तमनगरमध्ये कांदा २५ रुपये
पेठ बीड भागात कांदा २० रुपये तर शेवगा ८० रुपये किलो होता. उत्तमनगर भागात कांदा ३० रुपये तर दोडके ६० रुपये किलो होते. धानोरा रोड भागात बटाटे ३० तर मेथी जुडी १० रुपयांना होती. राजीव गांधी चौकात शिमला मिरची ४० रुपये, फ्लॉवर ६० रुपये किलो होते. तर भेंडी २५ ते ३० रुपये किलो होती.
३) पिकवतात शेतकरी, जास्तीचा पैसा तिसऱ्याच्याच हातात !
आडत बाजारातून भाजीपाला खरेदी करून अनेकजण हातगाडे किरायाने घेऊन शहरातील विविध भागात, वसाहतींमध्ये विकतात. मात्र या किरकोळ विक्रेत्यांकडील दर चढेच असतात. ग्राहकाची गरज समजून ते महाग विकतात, असे काही ग्राहकांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांऐवजी जास्तीचा पैसा तिसऱ्याच्या हातात जात असल्याचे दिसते.
४) एवढा फरक कसा?
शहरात कोठेही भाजीपाला विकणाऱ्यांचे दर आणि ठोक बाजारातील दरामध्ये किलोमागे ५ ते १० रुपयांपर्यंत फरक असू शकतो. त्यांना दिवसभर फिरावे लागते. रोजंदारीइतके उत्पन्न अपेक्षित असते. सध्या ठोक बाजारात ग्राहकी नसून भाव कमीच आहेत. समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. -- हुसेन जाफर बागवान, भाजीपाला अडत व्यापारी.
-----------
हातगाड्यावर मावेल इतकीच भाजी ठोक बाजारातून खरेदी करताना थोडा जास्त भाव मोजावा लागतो. शिवाय ढळते माप द्यावे लागते. शहरात भाजी विक्रीसाठी पायपीट करावी लागते. हातगाड्याचा किराया आहेच. घरपोच भाजी मिळत असल्याने व दरात फारसा फरक नसल्याने ग्राहकांना महाग वाटण्याचे काहीच कारण नाही. - शकुर बागवान, फिरता भाजी विक्रेता, बीड.
------
५) अर्धा-पाव किलोसाठी होलसेल बाजारात जाणे परवडत नाही !
होलसेल भाजी बाजारातून किमान दोन ते पाच किलो एकाच प्रकारची भाजी खरेदी करावी लागते. एवढा भाजीपाला घरात साठवून ठेवणेही नुकसानीचेच आहे. तसेच किरकोळ मंडई काय किंवा होलसेल बाजार काय तेथ जाण्यासाठी लागणारा पेट्रोल अथवा रिक्षा खर्च पाहता घराजवळ दोन- पाच रुपये जास्त लागलेले परवडतात. -- संजीवनी शिंदे, बीड.
---------------
भाजीपाला घरात लागतोच किती? अर्धा- पाव किलोसाठी दूरवर पायपीट तसेच गर्दीत जाण्यापेक्षा घराजवळ येणाऱ्या विक्रेत्याकडून आम्ही हवी ती भाजी खरेदी करतो. होलसेल भावात एकदम जादा भाजीपाला आणण्यापेक्षा रोज दारात ताजी भाजी मिळते शिवाय बाजारात जाण्याचा वेळही वाचतो. --- शकुंतला फुलसांगवीकर, बीड.
-------------