बीड : तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केल्याने नवीन उन्हाळी कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले आहे. मात्र, या कांद्याला पाहिजे तसा दर मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत. बाजारात आवक वाढल्याने दरात ८ रुपये किलोपर्यंत घसरण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
वन्यप्राण्यांचा त्रास
बीड : तालुक्यात ग्रामीण भागात वन्यप्राणी रानडुक्कर, हरीण यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे प्राणी सध्या परिसरात उभ्या असणाऱ्या उन्हाळी पिकांचे नुकसान करीत आहेत. हरणांच्या कळपांचा पिकांवर सुरू असलेला मुक्तसंचार धोकादायक ठरत आहे.
प्लास्टिक बंदीला खो
अंबाजोगाई : शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर आजही सर्रासपणे सुरूच आहे. शासनाने बंदी घातल्यानंतर प्लास्टिकच्या वापराला आळा बसणे आवश्यक आहे. पर्यावरणाला घातक ठरणारे प्लास्टिक वापरामुळे जमिनीचे मोठे नुकसान होत आहे.
फळविक्रेते प्रतीक्षेत
बीड : फळविक्रेत्यांना मुभा देण्यात आली असली तरी कडक निर्बंधांमुळे ग्राहक घराबाहेरच पडत नसल्याचे दिसून येत आहे. फळविक्रेत्यांना ग्राहकांची प्रतीक्षा आहे. कोरोनामुळे ग्राहक बाहेर जाणे टाळत आहेत.
कडबा भाव आवाक्यात
अंबाजोगाई : तालुक्यात अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी कडबा विक्रीसाठी काढला आहे. यावर्षी कडब्याचे भाव आवाक्यात आहेत. कडबा २ हजार ते २२०० शेकडा दराने विकला जात आहे.