धारूर शहराच्या परिसरातील चिंचपूर रस्त्यावर कृषी विजेच्या लोडशेंडिंगची वेळ निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे ‘महावितरण’चे अधिकारी, कर्मचारी मनमानी पद्धतीने वेळेत बदल करून लोडशेंडिंग करत आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतातील उन्हाळी कामाचे नियोजन बिघडत आहे. या रोडवरील शेतकरी पप्पू तिवारी यांनी रविवारी दिवसा वीजपुरवठा सुरू असते. त्यामुळे कांदा लागवड हाती घेतली. कांदा रोप मोकळी केली. मात्र, सकाळी अचानकच ‘महावितरण’ने मनमानीपणे वीजपुरवठ्याची वेळ बदलली. कांदा लागवड करत असताना पाणी असल्याशिवाय लागवड करणे शक्य नाही. ‘महावितरण’कडे वीज केव्हा येणार याविषयी विचारले असता, कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्यामुळे बंद झाला असल्याचे उत्तर दिले तसेच केव्हा पूर्ण दाबाने वीजपुरवठा होईल, याचीही माहिती संबंधितांना नव्हती. या मनमानी पद्धतीच्या कारभारामुळे रोप वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. ‘महावितरण’च्या गलथान कारभाराची चौकशी करून दोषी अभियंत्यांवर कारवाई करत लोडशेंडिंगच्या वेळा निश्चित कराव्यात, अशी मागणीही शेतकरी पप्पू तिवारी यांनी मुख्य अभियंत्यांकडे केली आहे.
‘महावितरण’च्या मनमानीमुळे कांदा रोप वाया गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 4:30 AM