बीड : येथील शिक्षक मोहम्मद फहीमोद्दीन अब्दुल रहीम यांना केबीसीच्या नावाखाली २९ लाख रुपयांना चुना लावणाऱ्या सात आरोपींना बीडच्या सायबर सेलने अटक केली होती. आणखी दोघांच्या सायबर पथकाने मुसक्या आवळल्या. यातील अब्दुल कैस हा आरोपी पाकिस्तानातील एकाच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचे समोर आले. ऑनलाइन फ्रॉडची रक्कम पाकिस्तानकडे तो कशासाठी वळवित होता, याचे गूढ कायम आहे.
शिक्षक मोहम्मद फहीमोद्दीन यांचा मोबाइल क्रमांक पाकिस्तानातील एका व्यक्तीने केबीसीच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये समाविष्ट केला. त्यानंतर केबीसीच्या स्टुडिओचे बनावट व्हिडिओ पाठवून २५ लाखांची लॉटरी, आलिशान कारचे आमिष दाखवून तब्बल २९ लाख २३ हजार रुपये उकळले. १३ डिसेंबर २०२१ रोजी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.
या प्रकरणात सुरुवातीला पाच व नंतर दोघांना अटक केली होती. याच साखळीतील अब्दुल कैस ऊर्फ अब्दुल रहेमान शेख हादी (२२,रा.मजोलिया पश्चिम चंपारन, बिहार) व आबिद आलम शामसुल अन्सारी (२८,रा.रानी पकडी मुफस्सील जि.पश्चिम चंपारन, बिहार) या दोघांचा सहभाग आढळला होता. त्यांना आधीच बिहारच्या बेतिया जिल्ह्यातील नवतन पोलिसांनी अवैध दारू प्रकरणात ताब्यात घेतल्याची माहिती मिळाल्यावर सायबर सेलचे पो.नि.रवींद्र गायकवाड, हवालदार भारत जायभाये, आसिफ शेख, अन्वर शेख, विजय घोडके, प्रदीप वायभट हे बिहारला रवाना झाले. ६ ऑक्टोबरला तेथील कारागृहातून त्या दोघांना ताब्यात घेऊन पथक १० ऑक्टोबरला बीडला पोहोचले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना २० ऑक्टोबरपर्यंत पाेलीस कोठडी सुनावली.
कैस फक्त मोहरा, पडद्यामागे शत्रूराष्ट्राची कोणती शक्तीऑनलाईन फ्रॉडचा सर्व पैसा पाकिस्तानमध्ये जात असल्याचे समोर आले असून तब्बल १२ कोटींचेे व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अब्दुल कैस हा पाकिस्तानी व्यक्तीच्या संपर्कात होता. सूरतच्या व्यापाऱ्यांना जरीच्या बदल्यात पाकिस्तानी व्यक्तीच्या सांगण्यावरून अब्दुल कैस पैसे देत असल्याचे आढळले आहे. कैस फक्त मोहरा आहे; पण पडद्यामागे शत्रूराष्ट्रातील कोणती शक्ती आहे, कैसचे पाकिस्तानशी नेमके कनेक्शन कसे,याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
शिक्षण दहावी, राहणीमान उंचीअब्दुल कैस याने सुरुवातीला धार्मिक शिक्षण घेतले. नववीला थेट प्रवेश घेऊन तो नंतर दहावी उत्तीर्ण झाला. शिक्षण जेमतेम असले तरी त्याने ऑनलाईन फ्रॉडच्या पैशातून अल्पावधीत चांगली कमाई केली आहे. फिरायला गाडी, राहायला चांगले घर, खात्यात पाच लाखांवर रक्कम व शेती असे त्याचे हायप्रोफाइल राहणीमान आहे. आबीद आलम हा त्याच्या गाडीवर चालक म्हणून काम करतो व फ्रॉडमध्येही त्यास आवश्यक ते सहाय्य करतो, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
त्या दोघांना तिसऱ्या गुन्ह्यात अटककेबीसी घोटाळ्यात या आधी पकडलेल्या नेहाल अख्तर, जुबेर अब्दुल या दोघांना अटक केलेली आहे. ते न्यायालयीन कोठडीत होते. १२ ऑक्टोबरला त्यांना केबीसी घोटाळ्याच्या तिसऱ्या गुन्ह्यात अटक केली. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अशोक नागरगोजे (रा.रुद्रापूर ता.बीड) यांना केबीसीच्या नावाखाली ४५ हजार ३०० रुपयांना गंडविल्याप्रकरणी २०२१ मध्ये बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.