येथील मानवलोक संस्था १०० खाटांचे, श्री बनेश्वर शिक्षण संस्था, केज तालुक्यातील बनसारोळा येथे पु. नारायणदादा काळदाते स्मृती प्रतिष्ठानचे ५० खाटांचे आणि वसुंधरा शिक्षण संस्था, घाटनांदूर, अलमुबारकी आयटीआय कॉलेज व मानवलोक संस्थेचे ५० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारले आहे. याचा लोकार्पण सोहळा ऑनलाइन पद्धतीने झाला. या नवीन तीन उपचार केंद्रांमुळे परिसरातील रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
या तिन्ही कोविड केअर सेंटरचे ऑनलाइन उद्घाटन खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. बीड जिल्ह्यातील सेवाभावी संस्थांनी एकत्र येत हा अतिशय स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. यामुळे या भागातील जनतेची कोरोना प्रादुर्भावाच्या काळात मोठी सोय झाली असून अद्ययावत वैद्यकीय सुविधा त्यांना मिळणार असल्याचे मत खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
यावेळी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, आ. संजय दौंड, जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या सिरसट, बजरंग सोनवणे, बीड जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार उपस्थित होते.
हा उपक्रम राबविल्याबद्दल मानवलोक संस्थेचे कार्यवाह अनिकेत लोहिया, बनेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भागवत गोरे, सचिव डॉ नरेंद्र काळे, वसुंधरा महाविद्यालयाचे सचिव गोविंद देशमुख, पु. नारायणदादा काळदाते स्मृती प्रतिष्ठानचे जी. जी. रांदड यांचे स्वागत होत आहे.