बीड : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा पुरविण्यासाठी शासनाकडून अनुदान मिळते. बीड जिल्ह्यातील २२५ विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता दिला जाणार असून, ३०० रुपयांप्रमाणे दोन महिन्यांचा प्रवास भत्ता मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार १ लाख ३५ हजार रुपये वाटप होणार आहेत. नजीकच्या शाळेच्या क्षेत्रामध्ये किंवा हद्दीच्या आत शाळा उपलब्ध नाहीत. अशा वस्त्यांमधील ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण देण्याच्या हेतूने मोफत परिवहन सुविधा किंवा अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याची कायद्यात तरतूद आहे. लाभार्थी विद्यार्थ्यांना त्यांच्या नजीकच्या नियमित प्राथमिक उच्च प्राथमिक शाळेत जाण्यासाठी एसटीची सोय अथवा मासिक पासची सोय ज्याठिकाणी उपलब्ध नसेल तेथे अधिकृत खाजगी वाहनांची सुविधा पुरविण्यासाठी केंद्र शासनाकडून वाहतुकीकरिता अनुदान प्रत्येक महिन्याकरिता सरासरी खर्च प्रतिविद्यार्थी ३०० रुपयांप्रमाणे दहा महिन्यांकरिता तीन हजार रुपयांपर्यंत तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे.
सर्व जिल्ह्यांतील शाळा व वसतिस्थाने यातील अंतराबाबतच्या प्राप्त माहितीच्या विश्लेषणानंतर वाहतूक सुविधेचा लाभ विद्यार्थ्यांना प्रदान करण्यासाठी यावर्षी राज्य शासनाने विद्यार्थीसंख्या निश्चित केली. जिल्ह्यातील २२५ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
कोरोनामुळे शाळा भरल्याच नाहीत
कोविड-१९ या जागतिक महामारी रोगाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांमध्ये पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यामुळे वस्ती स्थानांमधील पाचवी ते आठवीमधील विद्यार्थ्यांना समग्र शिक्षांतर्गत वाहतूक सुविधा उपक्रमांतर्गत फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचा लाभ उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय झालेला आहे.
लाभार्थी विद्यार्थ्यांचे अथवा त्यांच्या पालकांचे विशेषत: आईच्या बँक खात्यावर ही रक्कम जिल्हास्तरावर थेट जमा करण्यात येत आहे. आई नसल्यास अथवा तिचे खाते नसल्यास विद्यार्थ्याच्या जवळच्या अन्य पालकांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचे निर्देश आहेत.
ज्या विद्यार्थ्यांना वाहतूक व्यवस्था पुरविली आहे, अशा विद्यार्थ्यांची नोंद आधार क्रमांक, ज्या शाळेमध्ये शिकतो तेथील सरल डाटाबेस संगणक प्रणाली अथवा शालेय पोषण आहार योजनेच्या वेब पोर्टलद्वारे विद्यार्थी उपस्थितीची खातरजमा करावी, तसेच विद्यार्थ्यांची शाळेतील एकूण कमीत कमी ५० टक्के हजेरी ग्राह्य धरावी, अशाही सूचना आहेत.
बीड जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते आठवी वर्गातील २२५ विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता दिला जाणार आहे. सहाशे रुपयांप्रमाणे दोन महिन्यांचा प्रवासभत्ता मंजूर करण्यात आला असून, १ लाख ३५ हजार रुपये वाटप होणार आहेत. या लाभार्थींमध्ये बीड व अंबाजोगाई तालुक्यांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
----
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने दिलेल्या निर्देशानुसार पात्र विद्यार्थ्यांना वाहतूक अनुदान दिले जाते. त्यानुसार २२५ विद्यार्थ्यांना हे अनुदान मंजूर झाले आहे. सूचनेनुसार पुढील कार्यवाही करत आहोत.
-अजय बहीर, शिक्षणाधिकारी, बीड