बीड : जिल्ह्यात कोरोना संशयितांची चाचणी करण्यासाठी एकमेव लॅब ही अंबाजोगाईच्या स्वाराती महाविद्यालयात आहे. येथे आतापर्यंत ८६ हजार २६२ चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. दीड हजार चाचण्या परजिल्ह्यात झालेल्या आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात २ लाख १११ कोरोना चाचण्या पूर्ण झाल्या असून त्यात १८ हजार १४९ लोक बाधित आढळले आहेत.
राज्यात सर्वत्र कोरोनाबाधित रूग्ण आढळत होते, परंतु बीडमध्ये काळजी घेतल्याने एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला. त्यापूर्वी आणि नंतरच्या काही काळात बीड जिल्ह्यातील कोरोना संशयित लोकांचे आरटीपीसीआर स्वॅब घेऊन ते चाचणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले. नंतर लातूर आणि औरंगाबादच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. या तीन जिल्ह्यात १५५१ चाचण्या करण्यात आल्या. नंतर कोरोनासाठी आलेल्या निधीतून अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयात स्वतंत्र प्रयोगशाळा बनविण्याचे नियोजन झाले. येथे २ कोटी ७७ लाख रूपये खर्च करून लॅब उभारण्यात आली. आतापर्यंत येेथे ८६ हजार १६२ चाचण्या करण्यात आल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे.
दरम्यान, सुरूवातीला आरटीपीसीआर चाचण्या झाल्या. परंतू कोरोनाचा वाढता संसर्ग आणि संशयितांची संख्या पाहता ॲन्टिजन चाचण्या करण्यात येऊ लागल्या. आतापर्यंत जिल्ह्यात झालेल्या २ लाख १११ चाचण्यांपैकी १ लाख १६ हजार ९८३ ॲन्टिजन चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. याचा अहवाल अवघ्या अर्धा तासातच देण्यात येत आहे.
बीडच्या लॅबचा प्रस्ताव धुळखात
अंबाजोगाई बरोबरच बीड जिल्हा रूग्णालयातही कोरोना लॅब बनविण्यासाठी आरोग्य विभागाने जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे प्रस्ताव दिलेला आहे. याला अनेक महिन्यांचा कालावधी उलटला. परंतू बीड आरोग्य विभागाकडून याचा पाठपुरावा होत नसल्याने हा प्रस्ताव केंद्रात धुळखात पडल्याचे सांगण्यात आले.
इनकंक्लूझिव्ह अहवालावरून गोंधळ
कोरोनाच्या सुरूवातीच्या काळात अनेक अहवाल हे इनकक्लूझिव्ह येत होते. याचा अर्थही अनेकांना माहिती नव्हता. त्यामुळे गोंधळ उडत असे. ज्या व्यक्तिचा अहवाल इनकक्लूझिव्ह आला आहे, त्याची पुन्हा ४८ तासांनी चाचणी केली जात असे. त्या व्यक्तिच्या शरिरात व्हायरस प्रभावी आहे की नाही, हे समजत नसल्याने इनकक्लूझिव्ह अहवाल येत होता, असे सांगण्यात आले.
स्वारातीकडून माहिती देण्यास टाळाटाळ
जिल्ह्यात एकमेव असलेल्या लॅबसंदर्भात लॅब प्रमुख डॉ.निळेकर यांना संपर्क केला. परंतु त्यांनी अधिष्ठातांनी कोणालाच माहिती द्यायची नाही, असे सांगितल्याचे ते म्हणाले. तर अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे यांना संपर्क केला असता, सर्व माहिती घेऊन सांगतो, असे ते म्हणाले होते. परंतु एक दिवस उलटला तरी त्यांनी माहिती दिली नाही. यावरून येथील कारभाराबद्दल संशय व्यक्त होत आहे.
असे आहे मनुष्यबळ
या लॅबमध्ये सुरूवातीला जास्त मनुष्यबळ असल्याचे सांगण्यात आले. परंतु सद्यस्थितीत १२ टेक्निशियन, ३ डाटा एन्ट्री ऑपरेटर, ३ कक्षसेवक असे कर्मचारी येथे काम करतात.
----
अशी आहे आकडेवारी
परजिल्ह्यात केलेल्या चाचणी = १५५१
अंबाजोगाईच्या लॅबमध्ये चाचणी - ८६२६२
एकूण ॲन्टिजन चाचणी = १,१६,९८३