बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने तीन दिवस कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला. यामुळे माजलगाव शहर व तालुक्यातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने तीन दिवसांपासून कडकडीत बंद ठेवली आहे. संपूर्ण जिल्हा कडकडीत बंद असताना मात्र माजलगाव शहरात सर्वच अवैध धंदे जोमाने सुरू आहे. हातभट्टी अनेक ठिकाणी खुलेआम विक्री होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी क्लब सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. सध्या सर्वत्र बंद असताना शहरात मोंढा, शिवाजी चौक, संभाजी चौक, आदी ठिकाणी मटका खेळविला जातो. अवैध धंदे चालू असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांचा वावर सुरू आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक जमत असल्याने व त्यांचा वारंवार एकमेकांशी संपर्क होत असल्याने हे अवैध धंदे चालक कोरोनाला निमंत्रण देत आहेत.
हे सर्व अवैध धंदे सुरू असताना शहर पोलीस मात्र बघ्यांची भूमिका घेताना दिसत आहेत. येथील शहर पोलिसांनी कोरोना थांबविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असताना त्यांच्या दुर्लक्षतेमुळे अवैध धंद्याच्या माध्यमातून कोरोना वाढीस प्रोत्साहन मिळत असल्याचे चित्र आहे.
कापड दुकाने उघडी
सध्या तीन दिवसांपासून कडकडीत लॉकडाऊन पाळला जात असताना मात्र शहरातील मुख्य रस्त्यावरील अनेक कापड दुकाने पोलिसांना हाताशी धरून दिवसभर उघडी असल्याचे दिसून येत आहे.
ज्या ठिकाणी गर्दी असेल अशा ठिकाणी आम्ही वारंवार कारवाया करीत असतो.
-- धनंजय फराटे, पोलीस निरीक्षक शहर पोलीस ठाणे