सट्टा लावण्यात गुंतली तरुणाई
अंबाजोगाई : सध्या आयपीएल क्रिकेट सामने सुरू आहेत. क्रिकेट हा मनोरंजनाचा खेळ असला तरीही अंबाजोगाई तालुक्यात या खेळावर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातो. यापूर्वी या माध्यमातून अनेक युवकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. अजूनही अनेक तरुण यात गुंतत चालले आहेत. अशा गैरप्रकारांना वेळीच पायबंद घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.
घंटागाडीतून कोरोनाबाबत जनजागृती
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी घंटागाड्यांच्या माध्यमातून जनजागृती चे काम सुरू आहे. शहरात दररोज सकाळी १८ घंटागाड्या कचरा संकलनाचे काम करतात. गल्लोगल्ली या गाड्या स्पीकरच्या माध्यमातून आवश्यक त्या सूचना, उपाययोजनांची माहिती देत आहेत.
प्रभागनिहाय लसीकरणाची व्यवस्था करा
अंबाजोगाई : वाढत चाललेल्या कोरोनावर लसीकरण हा उपाय आहे.अंबाजोगाई तालुक्यात सध्या लसीकरणाची मोहीम जोरदार सुरू आहे. तालुक्यात २५ हजार नागरिकांचे लसीकरण झाले. अजूनही मोठ्या प्रमाणात लसीकरण बाकी आहे. लसीकरण लवकर व्हावे व वाढती गर्दी रोखण्यासाठी प्रत्येक प्रभागात लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक डॉ. अतुल देशपांडे यांनी केली आहे.
गल्लीबोळातील दुकाने सुरूच
अंबाजोगाई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून कठोर उपाययोजना केल्या जात आहेत. तरीही अंबाजोगाई तालुक्यातील नागरिकांना याचे अजूनही गांभीर्य नाही. अंबाजोगाई शहरात असणारी गल्लीबोळातील अनेक दुकाने दिवसभर सुरूच असतात. तसेच नागरिकही दिवसभर रस्त्यांवर भटकत असतात. अशा लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.