लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. तसेच मृत्यूही वाढले. हे थांबविण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले, परंतु तरीही काही लोक प्रशासनाच्या नियमांचे पालन करत नसल्याचे दिसत आहे. यातच खासगी ट्रॅव्हल्स आणि वाहनांचा समावेश आहे. खासगी ट्रॅव्हल्स सर्व नियम पायदळी तुडवून बिनधास्त धावत आहेत. ना सॅनिटायझरचा वापर केला जातो ना मास्क तोंडाला लावले जाते. असे असतानाही आरटीओ व वाहतूक शाखा पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.
आरटीओ विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार जिल्ह्यात जवळपास १५० ट्रॅव्हल्स आहेत. कोरोनामुळे यातील अपवादात्मक वगळता इतर ट्रॅव्हल्स जागेवरच उभ्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही सध्या उपासमारीची वेळ आली आहे. असे असले तरी काही ट्रॅव्हल्सवाले लॉकडाऊन असतानाही पुणे, मुंबईच्या वाऱ्या करीत आहेत. प्रशासनाकडून कसलीही परवानगी न घेता आणि कोरोना नियमांचे पालन न करताच ते ट्रॅव्हल्स पळवत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, या ट्रॅव्हल्सची तपासणी करण्याची जबाबदारी ही आरटीओ व पोलीस विभागाची आहे. परंतु त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जाते. रात्री १० वाजेच्या सुमारास चक्क बसस्थानकासमोरूनच या ट्रॅव्हल्स धावत असतानाही आणि चौकाचौकात पोलीस असतानाही त्या बिनधास्त जात असल्याने प्रशासनाच्या कामगिरीवर संशय व्यक्त होत आहे.
ना मास्क, ना सॅनिटायझर
वाहनात बसण्यापूर्वी आसनांची व्यवस्था व संपूर्ण ट्रॅव्हल्स सॅनिटाईज करणे अपेक्षित असते. परंतु असे कोणीच करताना दिसत नाही. तसेच प्रवासी, चालक व खासगी कर्मचारीही तोंडाला मास्क लावत नाहीत. हे सर्व लोक पुणे, मुंबई सारख्या हॉटस्पॉट भागात जाऊनही काळजी घेत नसल्याचे दिसत आहे.
साधी तपासणीही नाही
खासगी वाहनांची तपासणी करण्याची जबाबदारी ही आरटीओ व वाहतूक शाखा पोलिसांची आहे. परंतु त्यांच्याकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. आरटीओ तर या ट्रॅव्हल्सवाल्यांकडे कधीच फिरकत नाहीत. तर पोलिसांकडून डोळ्यासमोरून ट्रॅव्हल्स धावत असताना तपासणी केली जात नाही.
पासची तपासणी नाही
जिल्ह्याची सीमा ओलांडायची असेल तर ई-पास आवश्यक आहे. या खासगी ट्रॅव्हल्स रोज धावत आहेत. त्यांच्याकडे पास आहे का, याची तपासणी करण्याची तसदीही प्रशासनाकडून घेतली जात नाही. त्यांना अभय दिले जात आहे. हेच ट्रॅव्हल्स चालक सध्या प्रवाशांची आर्थिक लूटही करीत आहेत.
काय म्हणतात, पोलीस...
याबाबत एआरटीओ दीपक मेहरकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास भारती म्हणाले, आमच्या डोळ्यासमोर असे होत असेल तर तपासणी केली जाईल, परंतु हे काम एकट्या पोलिसांचे नाही. तरीही आता तपासणी करू, असे सांगितले.