बीड : हरवलेली, पळून गेलेली किंवा अपहरण केलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी १ ते ३१ डिसेंबरदरम्यान जिल्ह्यात ‘आॅपरेशन मुस्कान’ ही विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील २८ ठाण्यांमध्ये प्रत्येकी एक पथक नेमले आहे. यासंदर्भात शनिवारी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी सर्व ठाणे प्रमखांची बैठक घेतली आहे.
‘आॅपरेशन मुस्कान’ ही विशेष मोहीम स्थानिक गुन्हे शाखा व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष यांच्या वतीने राबविली जाणार आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील व रेकॉर्ड व्यतिरिक्त बेवारस बालके, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, धार्मिक स्थळे, हॉटेल, कारखाने, ढाबे या ठिकाणी काम करणारी, तसेच भीक मागणारे, कचरा गोळा करणारे व बालकामगार अशा १८ वर्षांखालील बालकांचा शोध घेतला जाणार आहे. या बालकांकडून माहिती घेत त्यांना त्यांचे नातेवाईकांकडे सुपुर्द केले जाणार आहेत. बेवारस मुलांना बालकल्याण समितीकडे हजर करण्यात येणार आहे.
या मोहिमेवर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे हे लक्ष ठेवून असणार आहेत. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक भारत माने यांच्या देखरेखीखाली ही मोहीम महिनाभर चालणार आहे.
पाच वर्षांत ३६३ मुलांचा शोधबीडपोलिसांच्या वतीने जिल्हाभरात ‘आॅपरेशन स्माईल’, ‘आॅपरेशन मुस्कान महाराष्ट्र-१-२ व ३’ अशा मोहिम हाती घेतल्या होत्या. यावर्षी ‘आॅपरेशन मुस्कान महाराष्ट्र-४’ ही मोहिम असेल. पाच वर्षांत ३६३ मुलांचा शोध घेऊन त्यांच्या नातेवाईकांकडे सुपुर्द करण्यात आले आहे.