बीड : अगोदर नॉन कोविड आणि आता कोविडकाळात जीव धोक्यात घालून टीमला सोबत घेऊन जिल्ह्यात नवनवीन संकल्पना, उपक्रम राबवून सेवा दिली. खरंतर, जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून मला ही संधीच मिळाली होती. मी पण याचे सोने केले. आता बदली झाली म्हणून खचणाऱ्यांतील मी नाही. साताऱ्यातही 'बीड पॅटर्न' राबविण्याचा प्रयत्न करेल, असे सांगताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार भावुक झाले. कोरोना महामारीत त्यांनी बीडकरांसाठी दिलेली सेवा प्रत्येकासाठी अविस्मरणीय असेल.
पाटोदा तालुक्यातील कुसळंब गावचे डॉ. पवार रहिवासी. आदर्श गावातील हे व्यक्तिमत्त्व आता आरोग्य विभागात आपली छाप पाडत आहे. २०१७ साली डॉ. पवार यांनी जिल्हा आरोग्य अधिकारीपदाची सूत्रे हाती घेतली. प्राथमिक आरोग्य केंद्रांना आलेली मरगळ झटकून तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांना विश्वासात घेत सामान्यांसाठी सेवेला लावले. उपकेंद्राच्या ठिकाणी समुदाय आरोग्य अधिकारी नियुक्त करून गावातच उपचार सुरू केले. गर्भवती मातांना स्त्रीरोगतज्ज्ञामार्फत तपासणी करून त्यांची प्रसूती आरोग्य केंद्रातच व्हावी, यासाठी प्रयत्न केेले. तसेच मागील साडेतीन वर्षांत आरोग्य केंद्रांमध्ये कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया सुरू केल्या. लोकाभिमुख व लाभदायक उपाययोजना व सुविधा देऊन डॉ. पवार हे आता सातारा येथे जिल्हा आरोग्य अधिकारीपदावर जाणार आहेत. शासनाने त्यांचे मंगळवारी आदेश काढले आहेत. त्यांच्या जाण्याने बीडकरांनी एक चांगला अधिकारी गमावला असून नव्या अधिकाऱ्यानेही अशीच सेवा बजावावी, अशी अपेक्षा आहे.
मी नाही, तर माझे काम बोलते
जिल्ह्यातील शासकीय संस्थांमध्ये १ लाख ८६ हजार २५५ प्रसूती, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत ६६ हजार ४२३ मातांना २८ कोटी रुपयांचा लाभ, सुरक्षा अभियानांतर्गत ८३ हजार ३०३ गर्भवतींची तपासणी व ४५ हजार ६९६ मातांची मोफत सोनोग्राफी, गोवर मिझल व रूबेला मोहिमेंतर्गत ६ लाख ४३ हजार ८९२ लसीकरण, कायाकल्पमध्ये १८ आरोग्य केंद्रांना बक्षीस, कोरोनात १८ लाख १० हजार लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग यासह तंत्रज्ञानाचा अवलंब करून सामान्यांना लाभ मिळवून दिला.
बीडकरांचे प्रेम, सहकाऱ्यांची साथ हृदयात ठेवणार
मी भूमिपुत्र असलो तरी प्रशासक आहे. एक अधिकारी म्हणून बीडकरांनी दिलेले प्रेम आणि तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच शिपाई ते जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली साथ व केलेल्या मार्गदर्शनामुळेच बीडचे नाव राज्यात अव्वल ठेवण्यात यश आल्याचेही डॉ. पवार यांनी सांगितले.