बीड : दोन वेळेस शिपाई पदासाठी निवड झाली. मात्र, कागदपत्र पडताळणीत बाहेर काढले. आता तिसऱ्या वेळेस पुन्हा निवड झाली. परंतु सातवी पासची गुणपत्रिका नसल्याने चंद्रसेन भाऊसाहेब बहीर (शिरापूर धुमाळ) या विद्यार्थ्यास पुन्हा एकदा नोकरीपासून मुकावे लागण्याची वेळ आली आहे. शिरापूर धुमाळच्या जिल्हा परिषद शाळेने आपल्याकडे रेकॉर्डच नसल्याचे लेखी उत्तर विद्यार्थ्यास दिल्याने पेच निर्माण झाला आहे.
२००७ - ०८ साली चंद्रसेन हा सातवी उत्तीर्ण झाला. त्यानंतर त्याने पदवीचे शिक्षण पूर्ण केले.कठोर परिश्रम घेत त्याने दिवसरात्र अभ्यास केला. त्यामुळेच त्याची मुंबई आणि रायगड येथे वेगवेगळ्या पदांसाठी निवड झाली. परंतु कागदपत्र नसल्याने बाहेर काढले.
आता पुन्हा त्याची मुंबई उच्च न्यायालयात शिपाई पदासाठी निवड झाली आहे. यासाठी सातवी उत्तीर्णची गुणपत्रिका आवश्यक आहे. त्याप्रमाणे चंद्रसेनने शिरापूर धुमाळ येथील जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक यांच्याकडे रीतसर अर्ज केला. परंतु येथील मुख्याध्यापकांनी आपल्याकडे रेकॉर्ड नसल्याचे लेखी लिहून दिले आहे. त्यामुळे आता करायचे काय, असा प्रश्न चंद्रसेन बहीर याच्यासमोर उपस्थित राहिला आहे.रेकॉर्ड उपलब्ध करुन माझ्यावर होणारा अन्याय टाळावा अशी मागणी चंद्रसेन बहीरने केली आहे.
मुख्याध्यापकांकडून रेकॉर्ड अद्ययावत ठेवण्याकडे दुर्लक्षजि. प. शाळेत यापूर्वी गंगा सागर मस्के या मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी आपल्या कार्यकाळात रेकॉर्ड अद्ययावत ठेवले नाही. त्यामुळेच आज विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे.आता राहुल इनकर यांनी पदभार स्वीकारला आहे. या शाळेतील आणखी कोणते रेकॉर्ड गहाळ झाले आहे हे तपासणी केल्यावरच समोर येणार आहे. मुख्याध्यापकांच्या दुर्लक्षामुळेच ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.