आष्टी : ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात उभे राहिल्याच्या कारणावरून पाच जणांनी एका तरुणास लोखंडी पाईपने बेदम मारहाण करून पिस्तुल दाखवून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याची घटना आष्टी तालुक्यातील रूईनालकोल येथे सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी पाच जणांवर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील शेतकरी संजय निवृत्ती चौधरी आणि त्यांचा भाऊ सोमवारी लग्न समारंभासाठी मिरजगावला गेले होते. लग्न आटोपून माघारी धामणगावकडे येत असताना दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास ते रूईनालकोल येथील स्टँडवर चहापाणी करण्यासाठी थांबले.
यावेळी एक जीप त्यांच्याजवळ येऊन थांबली आणि गाडीतून विजय भाऊसाहेब गाढवे, सागर रावसाहेब गाढवे, योगेश दिनेश पोकळे (तिघेही रा. धामणगाव) आणि कबीर मुहंमद सय्यद, संतोष दिलीप म्हेत्रे (दोघेही रा. कडा) हे पाच जण गाडीतून खाली उतरले. ‘तू आमच्या विरोधात ग्राम पंचायत निवडणुकीला उभा राहतोस, तू आमच्या नादी लागू नकोस’ असे म्हणत त्यांनी संजय चौधरी यांना शिवीगाळ करत लोखंडी पाईपने मारहाण करून गंभीर जखमी केले.
त्यांचा भाऊ कल्याण याने सोडविण्याचा प्रयत्न केला असत त्याला देखील मारहाण करण्यात आली. यावेळी विजय गाढवे आणि सागर गाढवे याने कंबरेचे पिस्तूल दाखवत यावेळेस वाचला आहात, यानंतर आमच्या नादी लागलात किंवा पोलिसात गेलात तर तुमच्या कुटुंबातील लोकांना गोळ्या घालून जिवे मारुत अशी धमकी दिली आणि निघून गेले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संजय चौधरी यांना भावाने तातडीने कडा येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अहमदनगर येथील रुग्णालयात दाखल केले असा घटनाक्रम संजय चौधरी यांनी फिर्यादीत नमूद केला आहे. सध्या संजय यांची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी पाचही आरोपींवर आष्टी पोलीस ठाण्यात कलम ३, ३२३, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ आणि शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.