अविनाश कदम
आष्टी : तालुक्यातील कडा येथील सुरेश कुंजीर व विजय कुंजीर या भावंडांनी रोजगारासाठी इतर ठिकाणी न जाता, स्वतःच्या शेतातच पारंपरिकऐवजी आधुनिक पद्धतीने शेती करत, माळरानावरील साडेचार एकर जिरायती व खडकाळ जमिनीवरच संत्रीची बाग फुलविली आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी नेहमीच अडचणीत येत असून, त्यातच दुष्काळ हा तालुक्याच्या पाचवीलाच पुजलेला. रोजगाराच्या निमित्ताने आष्टी तालुक्यातील युवक, नागरिक हे महाराष्ट्रच नव्हे, तर देशातील अनेक भागांत पाहावयास मिळतात, परंतु कडा येथील कुंजीर बंधुंनी शेतीमध्ये काहीतरी वेगळे करण्याचा ध्यास घेत फळबागेत रमणे पसंत केले. वर्षभरापासून कोरोनामुळे सी व्हिटॅमिनच्या फळांना मोठी मागणी आहे. एरव्हीही सीट्रस फ्रुटला मागणी असते. ही बाब ओळखून कुंजीर यांनी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांचे मार्गदर्शन घेत संत्री बाग उभारली. कुंजीर बंधूंनी तीन वर्षांपूर्वी नगर जिल्ह्यातील वाळकी येथील नर्सरीतून संत्रीची बाराशे रोप खरेदी केले. वेळोवेळी शेणखताचा वापर आणि फवारणी केली. कमी पाण्यावर ठिबक सिंचनाद्वारे किमया साधली. वातावरणातील बदल, निसर्गाचा लहरीपणा, तसेच शेतमालाचे सतत कोलमडणारे भाव, यामुळे शेतीसाठी केलेला खर्च निघणे ही अवघड होतो. कधी-कधी उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होत असल्याने अनेकदा शेतकरी खचून जातो. अशा कठीण परिस्थितीवर मात करीत कुंजीर बंधुंनी झाडे जोपासली आहेत.
शेततळे, मत्स्यपालनही
आजपर्यंत बागेसाठी एकरी वार्षिक दीड ते दोन लाखाचा खर्च केल्याचे विजय कुंजीर यांनी सांगीतले. भविष्यात पाण्याची टंचाई येऊ नये, म्हणून कुंजीर यांनी वीस-वीस गुंठ्यात दोन शेततळे करून त्यामध्येच विहिरीचे पाणी साठविले आहे. शेतीला जोड व्यावसाय म्हणून बंधुंनी याच शेततळ्यात मत्स्यपालनही केले आहे.
४० लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा
प्रत्येक झाडाला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला आहे. शेतात संत्री बागेसोबतच आंबा, पेरू, चिकू, सीताफळ, जांभूळ, नारळ इत्यादी फळझाडेही लावली आहेत. बाजारात प्रतिकिलो शंभर रुपये भाव मिळाला, तर पस्तीस ते चाळीस लाखांचे उत्पन्न एकाच वर्षात मिळेल, अशी अपेक्षा कुंजीर बंधुंना आहे.
कडा येथील सुरेश आणि विजय कुंजीर भावंडाने खडकाळ जमिनीवर संत्री बाग जोपासली आहे. पाण्याची टंचाई जाणवू नये, म्हणून शेततळे उभारून व्यवस्था केली आहे.
===Photopath===
250421\img-20210409-wa0410_14.jpg~250421\img-20210409-wa0409_14.jpg