आष्टी तालुक्यातील मंगरूळ येथील ईश्वर दत्तात्रय नवपुते याने देविनिमगाव येथील गोरख पाचारणे याचे बांधकाम हजेरीने घेतले होते. त्याच्यासोबत गावातीलच कांतीलाल काकडे हा देखील होता. हे बांधकाम अर्धवट सोडून आल्यानंतर ईश्वर व कांतीलाल यांना बांधकाम मालक गोरख पाचारणेसह त्याच्या दोन मुलांनी इतर साथीदारांच्या मदतीने राहत्या घरून मारहाण करून खासगी गाडीतून घेऊन गेेले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी २६ नोव्हेंबर २०२० रोजी ईश्वर यास देविनिमगाव येथे झालेल्या मारहाणीनंतर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर ईश्वरचे वडील आणि भावाने गोरख पाचारणेसह इतरांविरुद्ध अंभोरा पोलिसांकडे तक्रार दिली. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करून न घेता गोरख पाचारणे यांच्या म्हणण्यानुसार ईश्वरचा मित्र कांतीलाल काकडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणात ईश्वरच्या भाऊ व वडिलांच्या तक्रारीची दखल पोलिसांनी न घेतल्यामुळे ईश्वरच्या भावाने ॲड. भाऊसाहेब लटपटे यांच्यामार्फत आष्टी येथील न्यायालयात दाद मागितली. या प्रकरणात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत ॲड. लटपटे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या काही निर्णयांचा संदर्भ देत गुन्हे दाखल करण्याबाबत युक्तीवाद केला. यावरून न्यायालयाने ईश्वरच्या खून प्रकरणी स्वतंत्र फिर्याद नोंदवून गोरख पाचारणे, ठकाजी कसाब यांच्याविरुद्ध खुनाच्या गुन्ह्यांसह इतर कलमान्वये गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
नवपुते हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 4:30 AM