बीड : साईराम मल्टीस्टेटमध्ये ठेवलेल्या ठेवी परत न देता फसवणूक केल्याच्या आरोपावरुन चार ठेवीदारांनी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी होऊन साईनाथ परभणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दुसरे सह न्या. एन. ए. रणदिवे यांनी दिले.
ठेवीदार आशा दत्तात्रय पवार यांच्या ११ लाख २९ हजार ७६२ रुपयांच्या ठेवी होत्या. श्रीकिसन सुजनराव लाड यांच्या १२ लाख ७४ हजार ३७० रुपये तर निरंतर लक्ष्मण लाड व त्यांच्या पत्नीच्या नावे ११ लाख २८ हजार ९७५ रुपयांच्या ठेवी होत्या. तर लक्ष्मीबाई विष्णू फलके यांच्या ३ लाख रुपयांच्या ठेवी होत्या. या ठेवी मागणी करुनही परत मिळत नसल्याने ठेवीदारांनी गेवराई न्यायालयात धाव घेत फसवणूक झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा आदेश देण्याची विनंती केली होती.
चारही ठेवीदारांच्या या सर्व प्रकरणाची तारीख एकाच दिवशी ठेवण्यात आली होती. ठेवीदारांच्या वतीने ॲड. शरद काळे यांनी युक्तिवाद करुन ठेवीदारांची बाजू मांडली होती. चारही प्रकरणात ठेवीदारांचा अर्ज मंजूर करीत साईनाथ विक्रम परभणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दुसरे सह न्या. एन. ए. रणदिवे यांनी दिले. फिर्यादीच्या वतीने ॲड. शरद काळे यांनी काम पाहिले त्यांना ॲड. शेख अय्याज यांनी सहकार्य केले. न्यायालयाच्या आदेशानंतर आता पोलिसांच्या कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे.