बीड : आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या गुळाचे महत्त्व अलीकडच्या काही वर्षांत पटू लागल्याने बाजारात गुळाला मागणी सुरू झाली. यातच रसायनविरहित सेंद्रीय गुळाला विशेष मागणी होत आहे. कोरोनामुळे इम्युनिटी वाढविण्यासाठी गुळाचे खाण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे सेंद्रिय गूळ भाव खात असला तरी बाजारात तुलनेने साखरेचाच उठाव कायम आहे. मधुमेहींचे प्रमाण वाढू लागल्यानंतर गूळ खाण्याचे फायदे सांगणारे संदेश सोशल मीडियावर उमटत गेले. सकस आणि संतुलित आहाराबाबत जनजागृती झाली. आहारतज्ज्ञही गुळाचे महत्त्व पटवून देत असल्याने नैसर्गिक गुळाकडे कल वाढता आहे. परंतु साखरेच्या तुलनेने रक्कम दीडपट मोजावी लागत असल्याने पाहिजे तितकाच खरेदी केला जात आहे.
पूर्वी साखर खाणे हे स्टेटस मानले जात होते. ग्रामीण भागातही रेशनवर नियंत्रित दराने साखर मिळते. त्यामुळे साखर खाणाऱ्यांचे प्रमाण वाढतच राहिले आहे. साधा गूळ विक्री होत असे. १० किलोची ढेप किराणा दुकानांवर पहायला मिळायची. नंतर १ किलोच्या ढेप बाजारात आल्या. रासायनिक खतांची मात्रा दिलेल्या उसाचा गूळदेखील रासायनिक गणला जाऊ लागला. तर वाढती मागणी लक्षात घेत सेंद्रीय शेतीतून ऊस पिकवून त्याचा गूळ करून बाजारात विकण्यासाठी जिल्ह्यातील अनेक शेतकरी सज्ज झाले आहेत. आर्थिक तसेच पुरेशा मनुष्यबळाची अडचण असतानाही गावरान गूळ निर्मितीकडे शेतकरी, ग्रामीण उद्योजक वळत आहेत. तरीही साखरेचे भाव स्थिर व मागणीत सातत्य टिकून आहे.
------
साध्या गुळाचे भाव - २००० - २२, २००५- २५, २०१०- ३०, २०२० ३४, २०२१- ३५
साखरेचे भाव- २०००- २०, २००५ - २३, २०१०- २५, २०२०- ३५, २०२१-३५
--------------------
कोरोनामुळे गूळ विक्री वाढली, साखरेचा उठाव तितकाच
जेवणानंतर गूळ खातात. गुळाचे फायदे आता लक्षात येऊ लागले आहेत. मागील पाच वर्षात गावरान गुळाला मागणी वाढली आहे. चांगल्या प्रतीच्या गावरान गुळाचा भाव ५० ते ८० रुपये किलोपर्यंत आहे. पावडर, वडी, छोट्या पॅकिंग स्वरूपातील गुळाला मागणी वाढली आहे. ग्रामीण भागात मात्र साधा गूळच विकला जातो. कोरोनामध्ये गुळाची मागणी वाढली आहे. - अजित छाजेड, गुळाचे व्यापारी, बीड.
----------
सेंद्रीय गुळाला मागणी असली तरी बाजारात साखरेचा उठाव तेवढाच आहे. दोन वर्षांपासून साखरेचे भाव स्थिर आहेत. भाव वाढतील अशी शक्यता आहे. ग्राहक गुळाकडे वळले असले तरी साखरेच्या विक्रीवर फारसा फरक झालेला नाही. --- जवाहर कांकरिया, साखरेचे व्यापारी, बीड.
----------------
गुळामुळे पचनक्रिया सुलभ होते, अपायकारक नसते, कोणत्याही आजारावर गुणकारी आहे. गुळामध्ये लोह असल्याने हिमोग्लाेबीन वाढते. दहा वर्षापूर्वी गुळाची विक्री पंधरा टक्केच होती मात्र सध्या केमिकल विरहित गुळाला मागणी आहे. विविध काढ्यांसाठी गुळाचा वापर होऊ लागला आहे. - सूर्यकांत रायते, आहारतज्ज्ञ, बीड.
-------------
बाजारात साखरेची मागणी फारशी घटलेली नाही. साखरेच्या जागी साखरच विकली जाते. हॉटेल, ढाबा, मिठाईची दुकाने, लग्नसराईत साखरेचा वापर होतो. सेंद्रीय गुळाचा वापर करण्याचे प्रमाण दहा ते पंधरा टक्के इतकेच आहे. एखाद्या किराणा यादीत १५ किलो साखर असेल तर गुळाची मागणी केवळ दोन किलो असते. - गंगाबिशन करवा, किराणा व्यापारी, बीड.
-----------
गुळाचा चहा बनले स्टेटस
दुसरीकडे दोन वर्षात गुळाच्या चहाचा ट्रेंड वाढला आहे. गावात तसेच हॉटेलमध्ये साखरेसोबतच गुळाचा चहा मिळू लागला आहे. शहरात तर गावरान गुळाच्या चहाची स्वतंत्र हॉटेल उघडली आहे.
सणासुदीला गूळ वापरणारे आता रोजच्या आहारातही गुळाचा कमी -अधिक प्रमाणात वापर करीत आहेत. ग्रामीण भागातही गुळाचा वापर पुन्हा सुरू झाला आहे.
काही घरात चहातून साखर बाद झाली असून त्याची जागा गुळाने घेतली आहे. काढ्यासाठी साधारण गुळाचा वापर केला जात आहे.
--------