कडा : साखर कारखानदार आणि राज्यकर्त्यांनो, कारभार सुधारा अन्यथा जानेवारी महिन्यापासून पुन्हा कोयता बंद करू, असा इशारा ऊसतोड मजुरांचे नेते आ. सुरेश धस यांनी उसाच्या फडातून इशारा दिला आहे.
यंदाची दिवाळी जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांबरोबर साजरी करण्यासाठी उसाच्या फडात जाऊन त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधण्यासाठी धस यांनी विघ्नहर कारखाना, भीमाशंकर कारखाना, पराग कारखाना, सोमेश्वर कारखाना, साखरवाडी कारखाना, माळेगाव कारखाना, भवानीनगर कारखान्याच्या फड व थळाच्या ठिकाणी भेट दिल्या. घोडगंगा, जि. पुणे सहकारी कारखान्यावर मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत गोपीनाथराव मुंडे ऊसतोड मजूर मुकादम वाहतूकदार संघटनेचे सचिव सुखदेव सानप उपस्थित होते.
आ. सुरेश धस पुढे बोलताना म्हणाले की, कारखानदारांनो आपण जाणते आहात, आमची विनंती मान्य करा, कोयता बंद झाल्यास दोघांचेही नुकसान करू नका... या ऊसतोड मजुरांच्या जीवनात दिवाळी नाही, पाडवा नाही, भाऊबीज नाही. त्यांना त्यांच्या मेहनतीचे पैसे योग्य पद्धतीने दिले पाहिजेत. मुकादमाकडून घेतलेली उचल फिरली पाहिजे. त्यासाठी सध्याचे भाव काही कामाचे नाही. उचल फिटण्यासाठी ८५ टक्के भाववाढ मिळाली पाहिजे. मजुरांचे आरोग्य महिला भगिनींची प्रतिष्ठा राखण्यासाठी सार्वजनिक शौचालय नसल्याचे दिसून येत आहे. महिलांचे रक्तातील हिमोग्लोबिन तपासणी करण्यात येत नाही. आजारी महिलादेखील रात्रंदिवस काम करीत आहेत. त्यांच्या जीवनात एक वेळदेखील ताजे शिजलेले अन्न मिळत नाही. रात्रीचे शिळे अन्न दुसरे दिवशी दिवसभर खावे लागते आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांना ८५ टक्के भाववाढ मिळालीच पाहिजे अन्यथा जानेवारीमध्ये पुन्हा कोयता बंद ठेवण्यासाठी आपण सज्ज राहावे, असे आवाहनही आ. धस यांनी यावेळी केले.
८५ टक्के भाव वाढविणे आवश्यकऊसतोड कामगारांना माणूस म्हणून जगवा, त्यांच्या आरोग्यासाठी सार्वजनिक शौचालय तयार करा. सफाई कामगारांपेक्षा वाईट अवस्था असलेल्या मजुरांना कमीत कमी चारशे रुपये रोजंदारी येण्यासाठी ८५ टक्के भाव वाढविणे आवश्यक आहे. डिसेंबर महिना अखेरपर्यंत मुदत देऊ; परंतु कारखानदारांनी व राज्यकर्त्यांनी कारभार सुधारला नाही तर जानेवारी महिन्यापासून पुन्हा कोयता बंद करण्यात येईल, असा इशारा ऊसतोड मजुरांचे नेते आ. सुरेश धस यांनी दिला आहे.