मुंबई - भारतीय संरक्षण दलाच्या पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची (एनडीए) प्रवेश परीक्षा आता मुलींनाही देता येणार आहेत. तसा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने बुधवारी दिला. या परीक्षेसाठी आजवर मुलींना संधी नाकारल्याबद्दल कोर्टाने लष्कराला फटकारले आहे. मात्र, यापूर्वी सैन्य दलातील विविध बटालियनमध्ये महिलांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे, महिला अधिकारीही देशसेवा करत आहेत. भाजपा नेत्या आणि माजी मंत्री पकंजा मुंडेंनीही अशाच एका मराठमोळ्या लेकीच्या गगनभरारीचं कौतुक केलंय.
पंकजा मुंडेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये बीड जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील आयुषीने भारतीय वायू सेनेत भरती झाल्याबद्दल तिचं अभिनंदन केलं आहे. तसेच, हमारी छोरी छोरों से कम नही... असेही त्यांनी म्हटलं आहे.
मुलींना एनडीएचीही परीक्षा देता येणार
मुलींना एनडीएची प्रवेश परीक्षा देण्यासाठी संधी मिळावी, अशी विनंती करणारी याचिका कुश कार्ला यांनी कोर्टात केली होती. पात्रता असलेल्या मुलींना संधी नाकारून एनडीए राज्यघटनेच्या १४, १५, १६ व १९व्या कलमांचे उल्लंघन करीत आहे, असा आरोप याचिकेत केला होता. ही प्रवेश परीक्षा यंदा १४ नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे, आता या परीक्षेला मुलींनाही पेपर देता येणार आहे.