आष्टी तालुक्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. लहान-मोठे प्रकल्प तुडुंब भरले आहेत. पावसाळ्यात ठिकठिकाणी साचलेले पाणी, अस्वच्छता, वाढलेले गवत, घाणीचे साम्राज्य, वातारणात झालेला बदल, दूषित पाणी, त्यातच डासांचा मोठा प्रादुर्भाव वाढला आहे. मागील आठवड्यात काही खासगी दवाखान्यात डेेंग्यूसदृश आजाराची संशयित रुग्ण आढळून आले. सरकारी, खासगी रुग्णालयात साथ आजाराचे रुग्ण दिसून येत आहेत. परिसरात तुंबलेल्या नाल्या, सांडपाण्याचे डबके आणि दूषित हवामानामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे डास निर्मूलन करण्याबरोबरच साथरोगांना आळा घालण्यासाठी औषध फवारणी करण्यासाठी आरोग्य विभागाकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
नागरिकांनीही काळजी घ्यावी
पावसाळ्यात वातावरणातील बदलामुळे साथीच्या आजारांचा फैलाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेताना घराचा परिसर स्वच्छ ठेवावा, सांडपाणी साचू देऊ नये, डासांची उत्पत्तीला आळा घालावा. आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा. पाणी उकळून प्यावे. तसेच डेंग्यूसदृश व इतर साथ आजाराची लक्षणे आढळून आल्यास तत्काळ जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
------------