धारूर : तालुक्यात एकाही कोविड सेंटरला ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याने कोरोनाबाधित रुग्णांची गैरसाेय लक्षात घेता, उद्योजक तथा माजी नगराध्यक्ष माधवराव निर्मळ यांनी येथील ग्रामीण रुग्णालयात स्वखर्चाने ऑक्सिजन लाईनची व्यवस्था करून कक्ष उभारला आहे. या कक्षाचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच हा ऑक्सिजन बेड कक्ष रुग्णांसाठी कार्यान्वित होणार आहे.
धारूर शहरात तीन कोविड केअर सेंटर आहेत. मात्र एकाही ठिकाणी ऑक्सिजन बेडची सुविधा नसल्याने कोरोनाबाधित गंभीर रुग्णाला अंबाजोगाई किंवा बीडला उपचारासाठी पाठविण्याची वेळ येते. सर्वसामान्यांना खासगी रुग्णालयाचा खर्च पेलवत नाही; तर शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन बेड मिळण्यासाठी प्रचंड प्रयत्न करावे लागत होते. या आपत्तीकाळात नागरिकांची होणारी गैरसोय पाहून येथील तरुण उद्योजक, माजी नगराध्यक्ष माधवराव निर्मळ यांनी धारूर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. चेतन आदमाने यांच्याशी चर्चा केली. धारूर येथे कोरोना कालावधीनंतरही गंभीर रुग्णांना उपयोगी पडेल, असे ऑक्सिजन लाईनचे बेड असणारा स्वतंत्र कक्ष तयार करण्याचा व लागेल तो खर्च स्वत: करण्याचा मनोदय बोलून दाखवला. वडील समाजसेवक अंबादासराव आण्णा निर्मळ यांच्या स्मरणार्थ हा कक्ष करण्याचे त्यांनी निश्चित केले. धारूर ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनचे दहा बेड असणाऱ्या कक्षाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. मंगळवारी रात्री या चालू असलेल्या कामाची पाहणी माधवराव निर्मळ, जि. प. चे समाजकल्याण सभापती कल्याण आबूज, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. चेतन आदमाने, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सय्यद शाकेर यांनी पाहणी केली. कोविड कालावधीनंतर ही यंत्रणा पुढे उपयोगी ठरावी म्हणून चांगल्या दर्जाचे साहित्य वापरून हे काम करावे, असे निर्मळ यांनी सांगितले.
===Photopath===
190521\anil mhajan_img-20210519-wa0065_14.jpg