बीड : सध्या बाधितांची संख्या रोज हजारापार जात आहे. त्यातच ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्यांची संख्याही भरपूर असते. परंतु, काही रुग्णांचा ऑक्सिजन ९३ पेक्षा जास्त असतानाही ते ऑक्सिजन बेड सोडत नसल्याचे जिल्हा रुग्णालयात दिसत आहे. त्यामुळे गरजूंना ऑक्सिजन खाटा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे लक्षणे नसतील अथवा सौम्य असतील तर त्यांनी सीसीसीमध्ये थांबावे, येथेही आरोग्यकर्मी लक्ष ठेवून असतात, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
जिल्हा रुग्णालयात सध्या ऑक्सिजन बेड अपुरे पडत आहेत. आगोदर ३२० खाटा होत्या. त्यात आणखी १४० वाढविण्यात आल्या. या देखील अपुऱ्या पडत असल्याने नर्सिंग हॉस्टेल सुरू करून तेथे २६० खाटा ऑक्सिजनच्या तयार केल्या. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात तब्बल ७२० खाटा ऑक्सिजनच्या तयार झाल्या. असे असले तरी वाढती रुग्णसंख्या पाहता या खाटा अपुऱ्या पडू लागल्या. त्यामुळे आता आयटीआयच्या सीसीसीचेही डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये रूपांतर करून २०० खाटा ऑक्सिजनच्या तयार करण्यात आल्या आहेत. यालाही दोन दिवसांत सुरुवात होणार आहे. परंतु, सध्या जिल्हा रुग्णालयावर मोठा ताण आहे. काही रुग्ण लक्षणे नसतानाही आणि ऑक्सिजन लेव्हल चांगली असतानाही रुग्णालयात थांबण्याचा हट्ट धरत आहेत. आज बेड नाही लागला तरी नंतर लागेल, असे म्हणत ते बेडवर हक्क गाजवत असल्याचे दिसत आहे. यामुळे ज्या रुग्णांना खरोखरच ऑक्सिजनची आवश्यकता आहे, अशांना जमिनीवर झोपून उपचार घ्यावे लागत आहेत.
दरम्यान, ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता नाही, अशांनी बेड रिकामा करून गरजूंना देण्याची गरज आहे. यामुळे दुसऱ्या रुग्णांचे प्राण वाचू शकतात. मनातील गैरसमज दूर करावेत. सीसीसीमध्येही डॉक्टर, परिचारिका कर्तव्यावर आहेत. थोडाही त्रास झाल्यास अथवा ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यास त्यांना रुग्णालयात दाखल केले जात आहे. त्यामुळे ऑक्सिजन खाटांवर हक्क न गाजवता त्या रिकाम्या करून गरजूंना द्याव्यात, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
व्हेंटिलेटर, खाटाही अपुऱ्या
जिल्हा रुग्णालयात ६२ व्हेंटिलेटर खाटा आहेत. सध्या या देखील अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. तेथेही खाटा मिळत नसल्याची ओरड नातेवाइकांमधून होत आहे. दोन दिवसांपूर्वीच एका ४० वर्षीय रुग्णाला खाट मिळविण्यासाठी चार ते पाच नातेवाइकांनी शहरातील सर्व रुग्णालये पालथी घातली होती.
...
ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु, काही रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल चांगली असतानाही ते बेड सोडत नाहीत. सीसीसीमध्ये जाण्याचा सल्ला दिल्यानंतरही जात नाहीत. सीसीसीमध्ये देखील डॉक्टर, कर्मचारी आहेत. थोडाही त्रास झाला की ते रुग्णालयात पाठवितात. त्यामुळे गैरसमज दूर करून बेडवर हक्क गाजवू नये. ऑक्सिजन लेव्हल चांगली असेल आणि आमच्या डॉक्टरांनी सल्ला दिल्यास बेड रिकामा करावा. त्यामुळे दुसऱ्याला उपचार मिळतील.
-डॉ. सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड.