अंबाजोगाई :
कोरोना संकटकाळात लॉकडाऊनमुळे गतवर्षी बेरोजगार झालेल्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली.या काळात गावगाडा हाकणा-या बारा बलुतेदार व आठरा आलुतेदारांचेही प्रचंड हाल झाले.या वर्गाकडे केंद्र सरकारने आणि समाज व्यवस्थेनेही लक्ष दिले नाही .केंद्र शासनाने जाहीर केलेल्या २० लाख कोटी रूपयांच्या आर्थिक पॅकेजपासून हा वर्ग तर कोसोदूर राहिलेला आहे. त्यामुळेच या वर्गावर बिकट परिस्थिती ओढवू नये म्हणून लॉकडाऊन पार्श्वभूमीवर देण्यात येणा-या आर्थिक पॅकेजमध्ये बारा बलुतेदार व आठरा आलुतेदार बांधवांचा समावेश करावा अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केली आहे.
बारा बलुतेदारांमध्ये कुंभार,कोळी,गुरव, चांभार,मातंग,तेली, न्हावी,परीट,माळी, महार,लोहार,सुतार या वर्गांचा समावेश होता. हिंदूंप्रमाणे मुस्लिमांमध्येही बारा बलुतेदारांचा अंतर्भाव होता. त्यात आतार, कुरेशी,छप्परबंद, तांबोळी,पिंजारी- नदाफ,फकीर, बागवान,मदारी,मन्यार,मोमीन, मिसगर,शिकलगार आदी बारा जातींचा समावेश आहे. लॉकडाऊननंतर बाजारपेठा हळूहळू सुरू होतील.मात्र,रोटीच बंद झालेल्या गावगाडा हाकणा-या बारा बलुतेदारांच्या घरच्या चुलीचा खरा प्रश्न आहे.
बलुतेदारांपैकी शहरात आणि गाव खेड्यातील साळी,माळी,तेली, कुंभार,न्हावी,चांभार,शिंपी,सोनार,भोई, कोळी,रंगारी,धोबी, सुतार,लोहार,गवंडी या पारंपारिक व्यावसायिकांची दैना उडाली.विशेषतः हातावर पोट भरणा-या आहे.बलुतेदारांपैकी न्हावी,भोई,शिंपी, चांभार,परीट यांना मोठा फटका बसला आहे. सलुन व्यावसायिक,टेलरींग कारागीर,परीट,सुतार,लोहार,टोपली, केरसुणी तयार करून गावोगावी विक्री करणारे मातंग बांधव,चप्पल-बुट सांधणारे गटई कामगार,खारीमुरी-फुटाणे विकणारा भोई समाज,कोळी,कुंभार, सुवर्ण कारागीर आणि गावोगाव फिरून फुले जमवून हार आणि गुच्छ बनविणारे माळी बांधव,मंदिराची देखभाल करणारे गुरव बांधव,फळे विकून उपजिविका करणारे बागवान,गावोगावी -गल्ली बोळात बांगड्या विकणारे मनियार,गाद्या,दुलई तयार करणारे पिंजारी,यंत्रमागावर विणकाम करणारे जुलाहा (साळी) बांधवांचे लॉकडाऊनने अक्षरश: कंबरडेच मोडले आहे.आर्थिक पॅकेज देताना रोटी बरोबरच या सर्वांच्या रोजीचाही एकत्रित विचार व्हावा, अशी मागणी मोदी यांनी केली आहे.