- अनिल भंडारी
बीड : भारत सरकारने बीड जिल्ह्यातील गोसेवेचे व्रत घेतलेल्या बीड जिल्ह्यातील शब्बीरभाईंना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. मात्र पुरस्कार मिळालेल्या शब्बीरभाईंच्या एका डोळ्यात आनंद तर दुसऱ्या डोळ्यात दुष्काळात जनावरांना चारा पाणी कोठून आणायचा अशी चिंता लागून राहिली आहे.
दहिवंडी येथील शब्बीरभाईंचे कुटुंब व त्यांची गोसेवा प्रसारमाध्यमात उमटली होती. परंतू त्यांच्या या सेवेचा शोध घेत पद्मश्रीच्या रुपाने होणारा गौरव म्हणजे खऱ्या अर्थाने न्याय असाच म्हणावा लागेल. शब्बीरभाईंचे वडील बुढनभाई सय्यद यांनी चार पाच गायींवर गोपालन सुरु केले. त्याचा गोवर्धन शब्बीरभाईंनी (गावकरी त्यांना छबुभाई म्हणतात) व त्यांच्या कुटुंबाने उचलला. त्यांची मुलेही गोपालक म्हणूनच काम करतात. शब्बीरभाई, पत्नी अशरफबी, मुले रमजान व युसूफ, नातवं घरात कोणीही शिकलेले नाही. घरात सहा जण वयस्कर आहेत. मात्र सर्व कुटुंब गोसेवेसाठी झपाटलेले.
आज तिसरी पिढी सुद्धा तेवढेच तन्मयतेने काम करीत असल्याचे शब्बीरभाईंनी सांगितले. पाच- सहा वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी सुनिल केंद्रेकर यांनी शब्बीरभाईंची परीक्षा घेतली होती. ते साधा माणुस बनून त्यांचेकडे गेले व गाय मागितली. ४० हजार देतो, ५० हजार देतो म्हणाले आमचं उत्तर एकच होतं नाही. नंतर कळले, ते जिल्हाधिकारी सुनिल केंद्रेकर होते.
बीड जिल्ह्याला प्रथमच दोन ‘पद्मश्री’भारत सरकारने घोषित केलेल्या पुरस्कारामध्ये यंदा प्रथमच बीड जिल्ह्याला दोन पद्मश्रीचे सन्मान मिळाले आहेत. यात केज तालुक्यातील दरडवाडीचे रहिवासी नाटककार वामन केंद्रे आणि शिरुर तालुक्यातील दहिवंडी येथील गोपालक शब्बीर सय्यद यांचा समावेश आहे. शंकरबापू आपेगावकर यांच्यानंतर तीन दशकांनी पुन्हा एकदा बीडचे नाव भारताच्या नकाशावर उंचावले
रुखासुखा खा के सब काम करते हैवासरांना पाणी, वैरण, निवारा उपलब्ध करताना आमचे हाल होतात. रुखा सुखा खाके सब करते, सगळा वनवासच असे अशरफबी म्हणाल्या. गायींना चरायला ६-७ किलोमीटर परिघातील डोंगरात नेले जाते. मुले ते काम करतात. विशेष म्हणजे १२० गायींचा सांभाळ हे कुटुंब करत असलेतरी एकीलाही वेसण नाही. दूध काढून विक्री ते करत नाहीत. शेणखताच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून चारा, वैरणाची व्यवस्था करतात. त्यातून उरलेल्या पैशावरच घर चालवतो. १२० गायींचा सांभाळ करताना वेळोवेळी अडचणी येतात. तीन पिढ्यांपासून हा वसा घेतला, इनको कैसे छोडना, ये छोडने का वक्त है क्या, शब्बीरभाई और हम दो नहीं एक है. सुनासुध्दा माझ्या बरोबरीने काम करतात. मां कुछ बोलू नको, तकदीर जाने असे मुले म्हणतात आणि कामात हातभार लावतात, असे अशरफबी म्हणाल्या.
आयुष्यभराच्या गोसेवेचा हा सन्मानअख्खी जिंदगी गयी साब, तिसरी पिढी काम कर रही है. कोणत्याही बाबतीत भरवसा ठेवला तर त्या सेवेच फळ मिळते. आम्ही गायीवर भरवसा ठेवून काम केलं, त्या सेवेचं पद्मश्री पुरस्कार हे फळ आहे. पण यंदा दुष्काळामुळे कठीण परिस्थिती असल्याचे शब्बीरभाई म्हणाले.
चारा खरीदने को पैसा नहीलोक गोऱ्हे मागतात, देतो पण विकू नका म्हणून आवर्जुन सांगतो. खताच्या विक्रीतूनच मुलाबाळांचे कपडे, धान्य घेतो. शेतकरी खत खरेदी करायचे पण दुष्काळामुळे त्यांचे दिवस वाईट आहेत. आता खत कुठे विकायचे. अब जानवरों को डालने को कुछ नहीं, चारा खरीदने को पैसा नही.- शब्बीरभाई