पुरुषोत्तम करवा
माजलगाव : येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पंचायत समितीने गावात कंटेनमेंट झोन करणे आवश्यक होते. मात्र पंचायत समितीने पाठविलेले चुकीचे प्रस्ताव तहसीलदारांनी रद्द केले. त्यामुळे ३९ गावांतील नागरिक बिनधास्त फिरताना दिसत आहेत.
तालुक्यात सध्या ग्रामीण भागात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. माजलगाव येथील सेंटरमध्ये या महिन्यात ९ हजार १४० कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यात आरटीपीसीआरच्या १ हजार ८३५ चाचण्यांचा समावेश आहे. यात ३५२ रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर ७ हजार ३०५ अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या. यात १ हजार १६१ रूग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले.
तालुक्यातील ३९ गावांमध्ये कोरोनाचे पाचपेक्षा जास्त रुग्ण सध्या आढळून आले आहेत. वांगी, लवुळ, नित्रुड, बडेवाडी, चोपनवाडी, सादोळा, भाटवडगाव , चिंचगव्हाण ,उमरी ,आबेगाव ,तालखेड , लोनगावसह २८ गावांमध्ये पाचपेक्षा जास्त कोरोना रूग्ण आहेत.
पाचपेक्षा जास्त गावात कोरोना रुग्ण आढळलेली असतील तर त्या गावातील ग्रामपंचायतने पंचायत समितीकडे कोणाच्या घरापासून कोणाच्या घरापर्यंत कंटेनमेंट झोन करायचा, याचा प्रस्ताव द्यायचा आहे. त्यानंतर पंचायत समितीने हा प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठवायचा आणि मंजुरी मिळाल्यानंतर त्या गावात १४ दिवसांसाठी कंटेनमेंट झोन करायचा आहे.
सध्या माजलगाव तालुक्यात ३९ गावात कंटेनमेंट झोनचे प्रस्ताव पंचायत समितीमार्फत तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात आल्यानंतर या सर्व प्रस्तावामध्ये अनेक त्रुटी व अनेक चुकीचे प्रस्ताव दिल्याने तहसीलदारांनी हे सर्व प्रस्ताव रद्द केले. यामुळे एकाही गावात आतापर्यंत एकही कंटेनमेंट झोन होऊ शकला नाही. यामुळे या गावातील नागरिक मात्र इकडे तिकडे फिरताना दिसत आहेत. त्यांच्या या फिरण्याने रुग्ण वाढीची शक्यता निर्माण झाली आहे.
---- गाव मोकळे तर कार्यालयाला बंदोबस्त
पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी प्रज्ञा माने भोसले यांना ग्रामीण भागात कोरोना रूग्ण वाढत असतांना कसल्याच प्रकारचे गांभीर्य दिसून येत नाही. मात्र त्यांनी पंचायत समिती कार्यालयात समोर असलेले गेट दिवसभरासाठी बंद केले आहे. ज्यांना भेटायचे असेल त्यांनी अगोदर कोरोनाची टेस्ट करून त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे प्रमाणपत्र घेऊन आल्यावरच भेटण्याची परवानगी दिली जात आहे. त्यामुळे अनेक गावातील कामे सध्या रखडलेली आहेत.
तालुक्यातील वांगी गावात मागील एक महिन्यात ८० पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण निघालेले असतांना गावात कसल्याच प्रकारचे कंटेनमेंट झोन करण्यात आलेले नाही.
-- बाळासाहेब गरड ,वांगी ग्रामस्थ
आम्ही आतापर्यंत नऊ गावात कंटेनमेंट झोन केलेले आहेत.
-- प्रज्ञा माने भोसले , गटविकास अधिकारी पं.स.माजलगाव
पंचायत समितीने आमच्याकडे ३९ प्रस्ताव कंटेनमेंट झोन करण्यासाठी पाठवले होते. परंतु या प्रस्तावात अनेक त्रुटी असल्याने आम्ही हे प्रस्ताव रद्द केले.
---वैशाली पाटील ,तहसीलदार माजलगाव