लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरीच्या दिशेने गत दोन वर्षांपूर्वी साधारण १२५ बसेस धावल्या होत्या. परंतु, गत वर्षांपासून कोरोनामुळे लालपरी जागेवरच आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी लालपरीला जवळपास ४० लाख रुपयांचा फटका बसला आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून सध्या प्रवाशांसाठी बीडमध्ये कसल्याच सुविधा दिल्या जात नसल्याचा आरोप होत आहे.
नियंत्रकांना विभागाची माहितीच नाही
जिल्ह्यातील बसेस, उत्पन्न, कर्मचारी, अस्थापना, आगार, बसस्थानक ही सर्व माहिती विभागीय नियंत्रक पदावर असणाऱ्या अधिकाऱ्याला तोंडपाठ असणे आवश्यक असते. यापूर्वीचे अधिकारी तेवढे तत्परही होते.
परंतु, नुकताच पदभार घेतलेले अजय मोरे यांना कसलीच माहिती नव्हती. रत्नागिरीला आगारप्रमुख राहिलेले मोरे थेटे नियंत्रक झाल्याने हवेत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे राहुल वाईकर यांनी केला आहे.
प्रवाशांच्या हितासाठी अधिकाऱ्यांनी नियोजन करून प्रत्येक गावात बस सोडावी. वेळीच यात सुधारणा झाली नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही वाईकर यांनी दिला आहे.
बीड बसस्थानकात सर्वत्र धाणच घाण
बीड बसस्थानकात सध्या सर्वत्र घाणच घाण आहे. थोडाही पाऊस झाला की तलावाचे स्वरूप येते. यामुळेच या बसस्थानकाकडे प्रवासी फिरकत नसल्याचे दिसत आहे. दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
उद्या माहिती देतो
सलग दोन वर्षापासून आषाढी एकादशीसाठी धावणाऱ्या बसेस बंद आहेत. किती उत्पन्न मिळत होते, आणि किती तोटा झाला, याची माहिती मी उद्या देतो. मी १० दिवसांपूर्वीच रुजू झालो आहे.
- अजय मोरे, विभागीय नियंत्रक बीड