धारूर : तालुक्यातील पांगरी येथील जागृत देवस्थान नृसिंह मंदिरात दरवर्षीप्रमाणे जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. सलग ९९ व्या वर्षीदेखील सप्ताहाची परंपरा कोरोनाचे नियम पाळत कायम राखण्यात आली. मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत विधीवत जन्मोत्सव सोहळा साजरा झाला.
तालुक्यात पांगरी गावची वेगळी ओळख या ठिकाणच्या जागृत देवस्थान नृसिंह मंदिरामुळे आहे. गावाच्या दक्षिण दिशेस एक किलोमीटर अंतरावर शेकडो वर्षे जुन्या पिंपळाच्या झाडाखाली नृसिंहाचे जागृत मंदिर आहे. नृसिंह देवस्थानाकडे जाण्यासाठी डांबरी रस्ता तयार करण्यात आलेला आहे. सप्ताहाची नोंद अस्तित्वात असल्यापासून असून, चालूवर्षीचा ९९ वा सप्ताह होता. पूर्वी हा सप्ताह पाचदिवसीय होता; परंतु मागील २५-३० वर्षांपासून या सप्ताहाचे स्वरूप सात दिवसीय करण्यात आलेले आहे. या सर्व नागरिकांना प्रसाद स्वरुपात महाप्रसादाची सुविधा गावातील नागरिकांकडून केली जाते. या महाप्रसादाची तयारी बुद्ध पौर्णिमेच्या आदल्यादिवशी नृसिंह जन्माच्यादिवशी रात्री सुरू करण्यात येत असते. मागीलवर्षीप्रमाणे यावर्षीही कोरोना संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने लावून दिलेल्या कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासंबंधीच्या सर्व नियमांचे पालन करत हा उत्सव मोजक्या भक्तांच्या उपस्थितीत परंपरेनुसार साजरा करण्यात आला. कीर्तन, कथा, प्रवचन आदी सर्व कार्यक्रम रद्द करून आठ दिवस विणेकरी उभा करून सप्ताहाची परंपरा कायम ठेवण्यात आली.
नृसिंह सप्ताहानंतरच पेरणी कामांना सुरुवात
धारूर तालुक्यातील पांगरी पंचक्रोशीत सर्वात मोठा नृसिंहाचा सप्ताह असतो. हा सप्ताह झाल्यापासून पंचक्रोशीतील नागरिक पेरणीच्या कामाची सुरुवात करत असतात. नृसिंह सप्ताहापूर्वीच सर्व गावांतील सप्ताह संपन्न होतात. नंतर परिसरात कोणत्याच गावात सप्ताह होत नाही. नृसिंह सप्ताहासाठी पांगरीबरोबरच पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने येतात. प्रत्येकवर्षी बुद्ध पौर्णिमेला सप्ताहाच्या समाप्ती कार्यक्रमास गावातील बाहेरील मिळून आठ ते दहा हजार नागरिक उपस्थित राहत असतात.
===Photopath===
270521\anil mhajan_img-20210527-wa0091_14.jpg