लोकमत न्यूज नेटवर्कशिरुर कासार: स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या अथक प्रयत्नामुळे त्यांनी लोकांच्या मनामनावर अधिराज्य गाजवले होते. मला देखील जनतेने भरभरुन प्रेम दिलेले आहे. त्यामुळे नव्या आणि जुन्या पिढीचा समन्वय असणे अत्यंत गरजेचा आहे. जुन्या पिढीचा अवमान मी कदापिही सहन करणार नाही, अशा शब्दात पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी अतिउत्साही तरुण कार्यकर्त्यांची चांगलीच कानउघाडणी केली.
ऐतिहासिक मणिपूर नगरीत नारायण विठ्ठल रुख्मिणी मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे आगमन होताच त्यांचे स्वागत करून रथामधून मिरवणूक काढली. त्यांनी नुतन मंदिरात दर्शन घेतले. दर्शनानंतर मंदिरासमोरच श्रीक्षेत्र सिध्देश्वर संस्थांचे महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाचा श्रवण लाभ त्यांनी घेतला. दहीहंडीनंतर कीर्तनाची सांगता झाली. त्यानंतर त्यांचे आगमन मुख्य व्यासपीठावर झाले. यावेळी शिवलिंग शिवाचार्य महाराज, स्वामी विवेकानंद शास्त्री, आ. भीमराव धोंडे, आ. मोनिका राजळे, माजी आ. गोविंदराव केंद्रे, जि. प. अध्यक्षा सविता गोल्हर, जि. प. समाज कल्याण सभापती संतोष हांगे, मानूरच्या सरपंच चंद्रकला वनवे, जयदत्त धस, सर्जेराव तांदळे, मयुरी खेडकर, बाळासाहेब केदार आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक भाषणाचा धागा पकडत मनूरच्याच व्यासपीठावर आपले पहिले राजकीय भाषण झाल्याचा संदर्भ देत आपण पुढे मंत्री पदापर्यंत पोहोचलो आहोत. दिलेले भरभरून प्रेम कदापि विसरणे शक्य नाही, असे त्या म्हणाल्या. विकास हाच केंद्रबिंदू मानून मी व माझे सरकार काम करत असल्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.
शिरूरच्या तालुक्यात कापसाच्या बोंडअळीने झालेल्या नुकसान भरपाईसाठी १४ कोटी ५० लाख रुपयांची केलेली मागणी मंजूर झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी गावातील नारायण विठ्ठल रुख्मिणी मंदिरासाठी आमदार फंडातून १० लाख रुपये तर पालक मंत्र्यांच्या निधीतून २५ लाख रुपयांची मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यावर पंकजा मुंडेंनी त्यांच्या फंडातून १५ लाख व आमदारांतर्फे आमदार निधीतून १० लाख रुपयाचा निधी जाहीर केला. प्रास्ताविक रामदास बडे यांनी केले. माजी जि. प. सदस्य दशरथ वनवे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी जि. प. सदस्य शिवाजी पवार, सविता बडे, रामराव खेडकर, लिंबा नागरगोजे, मधुसूदन खेडकर, रवींद्र खेडकर, बाबूराव केदार, उपसभापती प्रकाश बडेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.