अंबाजोगाई - परळी येथील वैद्यनाथ बँकेच्या अध्यक्षासह संचालक मंडळावर बँकेच्या कर्जवितरण व व्यवहारात आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून दाखल झालेले गुन्हे रद्द करावे असा अर्ज अंबाजोगाईच्या अपर सत्र न्यायालयात दाखल झाला होता. मात्र दि. ५ सप्टेंबर रोजी अंबाजोगाई येथील दुसरे जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय देशपांडे यांनी सदरील अर्ज फेटाळून लावत परळी न्यायालयाचे आदेश कायम ठेवले आहेत. त्यांच्या या आदेशामुळे संचालकांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
बीड जिल्ह्यातील मोठी आर्थिक व नावाजलेली आर्थिक संस्था असलेल्या वैद्यनाथ सहकारी बँकेच्या अडचणीमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. मार्च - २०१७ मध्ये वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष व संचालक यांनी बँकेच्या कर्जवितरण व व्यवहारात संगनमत करून आर्थिक गैरव्यवहार करणे, बनावट दस्तऐवज तयार करून ते खरे असल्याचे भासवणे तसेच मालमत्ता तारण न करता विनातारण कर्ज देणे, ऑडीट रिपोर्टच्या नियमांचे उल्लंघन करणे अशा विविध कारणांमुळे व गैरप्रकारांमुळे बँकेचे तत्कालीन अध्यक्ष व संचालक मंडळ अश्या २६ जणाविरुद्ध परळी न्यालायालाच्या आदेशाने पोलिसात गुन्हा नोंद झाला होता. यापैकी तत्कालीन अध्यक्ष अशोक जैन, विनोद सामत, विकास डुबे, नारायण सातपुते, डॉ. राजाराम मुंडे, पुरुषोत्तम भन्साळी, जयसिंग चव्हाण, नितीन कोटेचा, प्रवीण देशपांडे, दासू वाघमारे, अनिल तांदळे, रमेश कराड, प्रकाश जोशी, शालिनीताई कराड, विनोद खर्चे, बँकेचे अधिकारी महेशचंद्र कवठेकर, प्रकाश मराठे, मुकुल देशपांडे, यांनी अंबाजोगाई येथील न्यायालयाकडे गुन्हे रद्द करावे असा अर्ज दाखल केला होता. या अर्जावर दि. ५ सप्टेंबर रोजी दुसरे अपर सत्र न्या. धनंजय देशपांडे यांनी तो अर्ज रद्द ठरवत परळीच्या न्यायालयाचे आदेश कायम ठेवले. त्यामुळे दाखल गुन्ह्यात पुढील कायदेशीर कार्यवाहीचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे बँकेच्या संचालकांची डोकेदुखी वाढली असून त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. बँकेच्या या संचालकाविरुद्ध सुभाष निर्मळ यांनी न्यायालयाकडे पाठपुरावा केला होता. याप्रकरणी फिर्यादी सुभाष निर्मळ यांच्या वतीने ॲड. अशोक कवडे यांनी बाजू मांडली.
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रकरण राज्यभर गाजत असतानाच तसेच जिल्हा बँकेच्या प्रकरणात सर्वच राजकीय पक्षांचे पुढारी न्यायालयीन प्रक्रियेत गुंतलेले आहेत. अद्यापही पोलीस तपास व न्यायालयाच्या कचाट्यातून सुटका न होताच वैद्यनाथ बँकेचे हे प्रकरण पुन्हा ऐरणीवर आल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.