परळी ( बीड) : भाजप नेत्या पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याकडे जीएसटी कराची 19 कोटी रुपयांची रक्कम थकली आहे. यामुळे कराची वसुली व मालमत्ता जप्ती संदर्भात छत्रपती संभाजीनगर येथील जीएसटी आयुक्तांनी शनिवारी कारखान्यास एक नोटीस जारी केल्याच्या माहितीने चर्चेला उधाण आले आहे.
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे ह्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन आहेत. हा कारखाना गेल्या दीडवर्षापासून बंद आहे. या साखर कारखान्यावर विविध बँकेचे कर्ज असून कर्मचाऱ्यांचे व कारखाना साहित्य पुरवठा दरांचे पेमेंटही थकले आहेत. तसेच जीएसटी कराची रक्कम ही कारखान्याने भरली नाही, सहा महिन्यापूर्वी जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वैद्यनाथ सहकारी कारखान्यात येऊन धाड टाकली होती. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपूर्वी जीएसटी विभागाच्या आयुक्त कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात येऊन 19 कोटीची जीएसटी कराची रक्कम भरण्यासंदर्भात व जप्तीच्या कारवाई संदर्भात एक नोटीस दिल्याचे सांगण्यात आले आहे.
वैद्यनाथ सहकारी कारखाना सध्याही बंद असून एका बँकेच्या ताब्यात आहे. मध्यंतरी एका बँकेतर्फे कारखान्याचा जाहीर लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. परंतु लिलाव काही झाला नसल्याचे सांगण्यात येते. 19 कोटीचा जीएसटी कर थकविल्या प्रकरणी कारखान्यातील मशीनरी जप्त करण्याची कारवाई केली जाणार असल्याची चर्चा आहे. परंतु या संदर्भात अधिकृत माहिती प्राप्त होऊ शकली नाही. वैद्यनाथ कारखान्याचे चेअरमन पंकजा मुंडे ह्या बाहेरगावी असल्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही तसेच साखर कारखाना बंद असल्याने येथे कोणीही अधिकारी उपलब्ध नाहीत.