बीड - दसऱ्यानिमित्त बीडमधील सावरगाव येथे आयोजित मेळाव्यामध्ये पंकजा मुंडे यांनी त्यांच्या भावी राजकीय वाटचालीबाबत स्पष्ट संकेत दिले आहे. सातत्याने डावलले गेल्याने असलेली नाराजीच्या चर्चा, पक्ष सोडणार असल्याच्या बातम्या यावर पंकजा मुंडे यांनी आजच्या सभेतून रोखठोक भाष्य केले. मी नाराज नाही. ज्या संस्काराच्या मुशीतून आपल्या देशाचे नेते आले आहेत त्याच संस्कारांच्या मुशीतूनच मी आले आहे. व्यक्ती श्रेष्ठ नाही तर संघटन श्रेष्ठ आहे, त्यावर माझा विश्वास आहे. आता मी २०२४ च्या तयारीला लागले आहे, असे सांगत पंकजा मुंडे यांनी नाराजीच्या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. पंकजा मुंडे समर्थकांना संबोधित करताना म्हणाल्या की, मी हात जोडून विनंती करते की आता हे नाराजीचे विषय बंद करा. ज्या संस्काराच्या मुशीतून आपल्या देशाचे नेते आले आहेत त्याच संस्कारांच्या मुशीतूनच मी आले आहे. मीसुद्धा १७ वर्षे राजकारणात आहे. व्यक्ती श्रेष्ठ नाही तर संघटन श्रेष्ठ आहे, त्यावर माझा विश्वास आहे. हा नियम सर्वांना लागू आहे. राजा असेल वा रंक सर्वांनाच हाच नियम आहे आणि मलाही तोच लागू आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, आता या चर्चा बंद करा. प्रसारमाध्यमांनीही यापुढे कुठल्याही आमदारांची यादी आली तर माझं नाव चालवू नये. मी तुमच्या पाया पडते. मी आता २०२४ च्या तयारीला लागले आहे. पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा होतात. पण मी कुणावर नाराज आहे? कुणावर नाराज होऊ मी? मात्र दसरा मेळाव्याला तुम्ही आला नाही, तर मी नाराज होईन. मी नाराज नाही. नाराज व्हायला हे घरगुती भांडण आहे. राजकारणात मोठमोठ्या लोकांना संघर्ष करावा लागलाय. तुमच्या लेकीच्या वाट्यालाही हा संघर्ष आलाय. आता संघर्ष करायचा आणि वेळेची वाट पाहायची, असा सूचक सल्लाही पंकजा मुंडे यांनी दिला.
यावेळी शेरोशायरी करत पंकजा मुंडेंनी आपल्या मनातील भावनांना मात्र वाट मोकळी करून दिली. त्या म्हणाल्या की, ‘’माना के औरोके मुकाबले कुछ पाया नही मैने पर खुद को गिराकर कुछ उठाया नही मैने’’, अशा शब्दात त्यांनी आपली भावना मांडली. त्या पुढे म्हणाल्या की, २०२४ च्या निवडणुकीसाठी परळी २०२४ च्या निवडणुकीसाठी परळी मतदार संघात पक्षानं तिकीट दिलं तर त्याच्या तयारीला लागणार आहे. असे सांगत आपण पुढच्या निवडणुकीत परळी मतदारसंघातूनच लढणार असल्याचे स्पष्ट केले. त्या पुढे म्हणाल्या की, जरुरत से जादा इमानदार हूँ मै इसलिए सबके नजरोमे गुनाहगार हूँ मै, अशा शब्दात पंकजा मुंडेंनी आपल्या मनातील सलही व्यक्त केली.