Pankaja Munde Crying : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना पराभवाचा सामना करावा लागला. पंकजा यांचा पराभव काही कार्यकर्त्यांच्या इतका जिव्हारी लागलाय की, ते आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. बीड जिल्ह्यात तर दोघांनी आत्महत्या केल्या. यातील चिंचेवाडी येथील पोपट वायभासे (37) यांच्या कुटुंबाला पंकजा यांनी भेट दिली. यावेळी कुटुंबीयांना धीर देताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर झाले. तसेच, माध्यमांशी बोलताना त्यांनी आत्महत्या थांबल्या नाही तर मी राजकारण सोडून देईल, असेही म्हटले.
काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
आज पोपट वायभासे यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यावर पंकजा मुंडे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, 'पहिली आत्महत्या झाली, तेव्हाही मी आवाहन केले होते की, असे काहीही करू नका. या घटनांमुळे माझ्या मनावर परिणाम झाला आहे. हे लोक माझ्यासाठी कुटुंबापेक्षाही जास्त जवळचे आहेत. ही लोक आत्महत्या करत आहेत हे मला अजिबात मान्य नाही. राजकारणात जय-पराजय सुरूच राहतो, आत्महत्या करु नका, अशी मी परत एकदा विनंती करते.'
'तुम्हाला जर हिमतीने लढणारा नेता हवा असेल, तर मलाही हिमतीने लढणारे कार्यकर्ते हवेत. आत्महत्या थांबल्या नाहीत, तर मी राजकारण सोडून देईल. मी पाया पडते, पण असं काहीही करु नका. पराभवाने मी हरणारी नाही, पण अशा घटना मला खूपच हादरवून टाकतात. आत्महत्यांचे सत्र आता इथेच थांबवा आणि हिमतीने माझ्या पाठीशी उभे राहा, आगामी 100 दिवसात हे सगळे चित्र बदलून टाकू,' असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले.
आतापर्यंत चार आत्महत्याबीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर बीड जिल्ह्यात आत्महत्यांची सत्र सुरू आहे. मागील रविवारी(दि.9) अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळअंबा येथील ऊसतोड कामगार युवक पांडुरंग रामभाऊ सोनवणे (वय ३३) यांनी शेतात गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानंतर, चिंचेवाडीतील पोपट वायभासे या तरुणाने मंगळवारी(दि.11) आत्महत्येचे पाऊल उचलले. तर, आज पंकजा यांचा दौरा सुरू असताना वारणी येथील गणेश उर्फ हरिभाऊ भाऊसाहेब बडे या तरुणानेही टोकाचे पाऊल उचलले. याशिवाय, ‘पंकजाताई निवडून नाही आल्या तर सचिन गेला...’ असा व्हिडिओ व्हायरल करणारा लातूर जिल्ह्यातील सचिन मुंडे, या तरुणाचाही मृतदेह शुक्रवार(दि.7) रोजी आढळून आला होता.