परळी: राज्यात गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळाव्यावरुन जोरदार वाद सुरू होता. शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटामध्ये शिवाजी पार्कावर दसरा मेळावा घेण्याचा वाद कोर्टात गेला. अखेर कोर्टाने ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासोबतच बीडमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याचीही जोरदार चर्चा असते.
कोरोनामुळे गेल्या तीन वर्षांपासून मुंडेंचा दसरा मेळावा अतिशय साध्या पद्धतीने झाला होता. मात्र यावर्षी परवानगी मिळाल्याने हा मेळावा मोठ्या प्रमाणात हा मेळावा साजरा केला जाणारा आहे. त्याच अनुषंगाने संत भगवान बाबा यांचे जन्मगाव असलेल्या सावरगाव मध्ये मेळाव्याची मोठी तयारी सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे यांनी या तयारीचा एक व्हिडिओही शेअर केला होता.
विशेष म्हणजे, भाजप नेते गोपीनाथ मुंडे हयात असताना दसरा मेळावा भगवान गडावर व्हायचा. पण, त्यांच्या निधनानंतर भगवानगडाचा वापर राजकारणासाठी नको अशी भूमिका घेत पंकजांच्या मेळाव्याला विरोध करण्यात आला होता. तेव्हापासून हा मेळावा सावरगावच्या भगवान भक्तीगडावर घेतला जातो.