बीड - सीएम चषक क्रिकेट स्पर्धेअंतर्गत राज्यभर सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धांमुळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारला आहे. त्यातच, शुक्रवारी परळी विधानसभा मतदारसंघात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याहस्ते सीएम चषख स्पर्धेचे उद्घाटन झाले. त्यावेळी, पंकजा यांनी आर. टी. देशमुख यांच्या गोलंदाजीवर षटकार ठोकला. तर आमदार लक्ष्मण पवार यांना क्लीन बोल्ड केले. पंकजा यांची ही अष्टपैलू खेळी पाहून सर्वचजण अचंबित झाले होते.
परळी तहसील कार्यालयासमोरील मैदानात शुक्रवारपासून सीएम चषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेच्या उद्घाटनानंतर पंकजा मुंडे यांनी बॅटींग आणि बॉलिंगद्वारे खेळाचा आनंद घेतला. नेहमीच राजकीय मैदानावर फटकेबाजी करणाऱ्या पंकजा यांची ही खेळी पाहून कार्यकर्तेही अवाक झाले. आमदार आर. टी. देशमुख यांनी गोलंदाजी करण्यासाठी बॉल हाती घेतला. त्यांनी नेहमीप्रमाणे सहजच बॉल टाकला आणि पंकजा मुंडेंनी उत्तुंग षटकार ठोकला. पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून आपण राजकीयच नाही, तर क्रिकेटच्या मैदानावरही उत्कृष्ट खेळाडू असल्याचं पंकजा यांनी दाखवून दिलें. पंकजा यांचा हा षटकार पाहून उपस्थित नेते अन् कार्यकर्त्यांनी टाळ्या-शिट्ट्या वाजवल्या.
आगामी काळात शहरात भव्य क्रीडा संकुल उभारण्याचा आपला मानस असून त्यासाठी निधी बरोबरच जागाही उपलब्ध करून देवू अशी ग्वाही यावेळी पंकजा यांनी दिली. भाजपने राज्यभर आयोजित केलेल्या सीएम चषक स्पर्धांमुळे युवकांना प्रोत्साहन मिळत आहे. या अगोदरही शहरात गौरी गणेश महोत्सव, टर्निंग पाँईंटच्या वतीने आपण महिला, युवक व शालेय विद्यार्थ्यांच्या कला व क्रीडा गुणांना वाव देणारे कार्यक्रम हाती घेतले होते. आता, मैदानी स्पर्धा यानिमित्ताने घेण्यात येत आहेत. शहरात क्रीडा स्पर्धेसाठी चांगले वातावरण तयार होत आहे, त्याला अधिक वाव देण्यासाठी भव्य क्रीडा संकुल उभारण्याचा माझा विचार आहे, त्यासाठी लागणाऱ्या जागेचा प्रश्नही आपण सोडवू, असे आश्वासन पंकजा यांनी परळीकरांना दिले.