भगवानगड-
संघर्ष कुणालाच चुकलेला नाही. छत्रपतींनाही संघर्ष करावा लागला. त्यामुळे संघर्षाचा काळ प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच. पण संघर्षात मी थकणार नाही आणि मी कुणासमोर झुकणार नाही, असं वक्तव्य भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्या भगवान गडावरील आयोजित दसरा मेळाव्यात बोलत होत्या. पंकजा मुंडे यांना ऐकण्यासाठी भगवान गडावर हजारोंची गर्दी जमली होती. उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना पंकजा मुंडे यांनी डोंगर कपाऱ्यातील लोकांना नेहमीच संघर्ष करावा लागत आला आहे असं म्हटलं.
'आमचा मेळावा चिखलफेक करणाऱ्यांचा नाही, चिखल तुडवणाऱ्यांचा मेळावा आहे'
पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मुंबईतील ठाकरे आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावर टीका केली. "मुंबईतही आज दसरा मेळावा आहे. पण त्यांचा मेळावा म्हटलं की राजकीय चिखलफेक असते. पण आपला मेळावा चिखलफेक करणाऱ्यांचा नाही. तर चिखल तुडवणाऱ्यांचा आहे. चिखल तुडवणं संघर्ष करणं आमच्या रक्तातच आहे. कधीच मी कुणावर वैयक्तिक आरोप केले नाहीत. कधीच संधीचा फायदा घेतला नाही ते आमच्या रक्तातच नाही", असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
देवीच्या चरणी एकच गोष्ट मागेन"नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. नऊ दिवस नऊ देवींची आराधना आपण केली. त्यासर्व आदिशक्तींच्या चरणी मी नतमस्तक होते. देवीकडून काही मागायचं असेल तर या डोंगरकपाऱ्यातील लोकांना चांगले दिवस येऊदेत असं साकडं मी घालेन. तसंच स्वाभीमानाचं जीवन मागेन आणि मृत्यू देखील स्वाभीमानानं येऊ देत", असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
संघर्ष कुणालाच चुकलेला नाही"आयुष्यात संघर्ष कुणाला चुकलेला नाही. छत्रपती शिवरायांना संघर्ष करावा लागला. छत्रपती संभाजी महाराजांना संघर्ष करावा लागला. त्यामुळे संघर्षाचा काळ प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या ४० वर्षांच्या राजकारणात साडेचार वर्ष सत्तेची सोडली तर इतर संपूर्ण काळ संघर्षाचाच होता. त्यामुळे त्यांच्यासमोर माझा संघर्ष काहीच नाही", असं पंकजा मुंडे म्हणाल्या.