बीड - भाजपकडून राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली. मात्र, भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा पत्ता कट करण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्याच पार्श्वभूमीवर एका कार्यकर्त्याने किटकनाशक द्रव्य पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तर, ताई नाही तर भाजपा नाही... असे मेसेजही व्हायरल झाले. आता, पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी मोदींच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर संधी हुकल्यानंतर त्यांच्या समर्थकांची, बीडमधील भाजप पदाधिकाऱ्यांची अस्वस्थता समोर आली. अगोदर खा. प्रीतम मुंडे यांना मंत्रीपदापासून डावलं आणि आता भाजप नेत्या पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर घेण्याचे सांगत ऐनवेळी त्यांचा पत्ता कट केला. त्यामुळे बीडमधील भाजप नेते आक्रमक होताना दिसत आहे. पंकजा मुंडेंसमोर पक्षातीलच काहींनी संकटे उभी केली आहेत. त्यामुळे, कुटुंबप्रमुख देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे कळावे, यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी बीडच्या कंकालेश्वर मंदिरात नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत साकडं घातले.
हर हर महादेव, पंकजा मुंडे तुम आगे बढो... अशा घोषणांनी कंकालेश्वर मंदिर परिसर दणाणून गेला होता. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर घेण्यासाठी मीडिया ट्रायल केला होता. त्यानंतर त्यांनी केंद्राकडे बोट दाखवलं. त्यामुळे पंकजा ताईंना उमेदवारी का मिळाली नाही, याचे उत्तर चंद्रकांत पाटील यांनीच द्यावं, अशी नाराजी बीड भाजप पदाधिकाऱ्यांतून दिसून येत आहे. दरम्यान, दोन दिवसानंतर पंकजा मुंडे माध्यमांसमोर बोलणार आहेत. त्या आधीच पंकजा समर्थकांनी कंकालेश्वर मंदिरात दुग्धाभिषेक घालत मोदींना साकडे घातलं आहे.