बीड - भाजपा नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी यासंदर्भात माहिती दिली. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतलं होतं. आज, त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती त्यांनी दिली. दोन दिवसांपूर्वीच पंकजा यांनी अंबाजोगाई येथील सरकारी रुग्णालयाच्या कामकाजाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला होता.
मी कोरोना पॉझिटीव्ह झाले असून अगोदरच विलीकरणात आहे, कोरोना बाधितांच्या परिवाराच्या भेटी दिल्या तेव्हा लोकांच्या संपर्कात आले असेन. माझ्या समवेत दौऱ्यात असणार्यांनी टेस्ट करून घ्यावी, काळजी घ्यावी, असे ट्विट पंकजा यांनी केलं आहे. पंकजा यांच्या ट्विटनंतर कार्यकर्त्यांनी त्यांना काळजी घ्या आणि लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. त्यांच्या ट्विटवर अनेकांना तशा कमेंट केल्या आहेत.
अगोदर होत्या विलगीकरणात
एकाच अॅम्ब्युलन्समध्ये 22 जाणांचे मृतदेह कोंबून त्यांची विटंबना करण्यात आली होती. ही भयानक घटना माझ्या बीड जिल्ह्यातली आहे. त्या 22 लोकांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त करावं, की त्यांच्या मृतदेहाची विटंबना केल्याबद्दल संताप व्यक्त करावा, हे मला कळत नाही, अशा शब्दात पंकजा मुंडेंनी अंबाजोगाईतील घटनेबद्दल संताप व्यक्त करत सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मी ऑयसोलेटेड असल्याने मला ही बातमी उशिरा समजली, असेही त्यांनी म्हटले होते.
मुख्यमंत्र्यांकडे केली होती विनंती
रुग्णालयाच्या डिने स्वत:ची जबाबदारी कलेक्टरवर ढकलली, कलेक्टराचं असं झालंय की ते बोलूच शकत नाहीत. बीड जिल्ह्यात सध्या शासनानं अत्याचार करायचं ठरवलंय अन् प्रशासनाने हात टेकले आहेत. हे कॉम्बिनेश बीड जिल्ह्याच्या भविष्यासाठी आणि आत्ताच्या परिस्थिती अत्यंत भयानक आहे, असे म्हणत अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडेंनी पालकमंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. पंकजा यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून या घटनेबद्दल संताप व्यक्त केलाय. तसेच, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बीड जिल्ह्याकडे जातीनं लक्ष द्यावे, अशी विनंतीही पंकजा यांनी केलीय.